राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी सार्जंट अनंत अनन्या अभिजीत चिंचकर याने राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आपल्या गावाचे, जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव उंचावले आहे. त्याच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल आज सावंतवाडीत त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.दिल्ली येथे लेफ्टनंट जनरल गुरप्रीत सिंग यांच्या हस्ते त्याला सुवर्णपदकाचा बहुमान मिळाला होता. सावंतवाडीत परतल्यानंतर कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रशासनाने त्याचे जोरदार स्वागत केले. गवळी तिठा येथून एका भव्य मिरवणुकीने या स्वागताची सुरुवात झाली. ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गांनी, जसे की दीपकभाई केसरकर कार्यालय, श्रीराम वाचन मंदिर, गांधी चौक, जयप्रकाश चौक आणि बाजारपेठ, अशा मार्गांनी शाळेपर्यंत पोहोचली.शाळेच्या सभागृहात अनंत चिंचकरचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, एन.सी.सी. विभागाचे श्री. गवस, श्री. बागुल, वैभव केंकरे यांच्यासह सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अनंतच्या या यशाचे कौतुक केले आणि त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









