वृत्तसंस्था/ मालेगा (स्पेन)
सर्बियाचा टॉप सिडेड टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने आपल्या वैयक्तिक शानदार कामगिरीच्या जोरावर ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. या स्पर्धेच्या इतिहासात जोकोविच हा इतर टेनिसपटूंच्या तुलनेत अधिक यशस्वी खेळाडू ठरला आहे. सर्बियाने या स्पर्धेच्या इतिहासात गेल्या 3 वर्षांमध्ये दुसऱ्यांदा उपांत्यफेरी गाठली आहे.
सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचने ब्रिटनच्या कॅमेरून नुरीचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत आपल्या संघाला ब्रिटनवर 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. या स्पर्धेमध्ये गुरुवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इटलीने नेदरलँड्सचा 2-1 अशा फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. ब्रिटन विरुद्धच्या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात सब्रियाच्या केमॅनोव्हिकने ब्रिटनच्या ड्रेपरचा 7-6 (7-2), 7-6 (8-6) असा पराभव केला. जोकोविचने अलिकडच्या कालावधीत 40 एकेरी सामने सलग जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात ब्रिटनने आतापर्यंत 10 वेळेला अजिंक्यपद मिळविले आहे. तर गेल्या 4 वर्षांच्या कालावधीत प्रथमच ब्रिटनने उपांत्य फेरी गाठली आहे. 2010 साली जोकोविचच्या नेतृत्वाखाली सर्बियाने केवळ एकदाच डेव्हिस चषकावर आपले नाव कोरले होते.
नेदरलँड्स आणि इटली यांच्यातील लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात नेदरलँड्सच्या झेंडस्कल्पने इटलीच्या मॅटो अॅमेल्डीचा 6-7 (6-8), 6-3, 7-6 (7-5) असा पराभव केला. हा सामना जवळपास 3 तास चालला होता. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात इटलीच्या सिनेरने नेदरलँड्सच्या ग्रिकस्पूरचा 7-6 (7-3), 6-1 असा पराभव करत आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात सिनेर आणि सोनेगो या जोडीने ग्रिकस्पूर व कूलहॉप यांचा 6-3, 6-4 असा पराभव करत नेदरलँड्सचे आव्हान संपुष्टात आणले. 1976 साली इटलीने डेव्हिस चषक स्पर्धा आतापर्यंत एकदाच जिंकली आहे. आता या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि फिनलँड यांच्यात दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामना खेळविला जाणार आहे.









