कलकत्ता उच्च न्यायालयाची टिप्पणी ः घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो पती
वृत्तसंस्था / कोलकाता
मानसिक क्रूरतेच्या आधारावर कुठल्याही पतीकडे घटस्फोट मागण्याचा अधिकार असल्याचे कलकत्ता उच्च न्यायालयाने स्वतःच्या एका निर्णयात म्हटले आहे. एका महिलेने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पतीला त्याच्या आईवडिल अन् कुटुंबापासून दूर करण्याचा प्रयत्न क्रूरतेसमान असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने या महिलेची याचिका फेटाळली आहे. संबंधित महिला स्वतःच्या पतीवर आईवडिलांना सोडून देण्याचा दबाव टाकत होती असा आरोप आहे.
जर पत्नीने मानसिक स्वरुपात अत्याचार केल्यास तसेच कुठलेही ठोस कारण न सांगता पतीला पालकांकडून वेगळे राहण्यास भाग पाडल्यास पतीला पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा अधिकार असल्याचे उच्च न्यायालयाने स्वतःच्या आदेशात नमूद केले आहे. कुटुंब न्यायालयाने पतीच्या घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला होता, परंतु या निर्णयाला महिलेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. स्वतःच्या आईवडिलांची काळजी घेणे हे एका पुत्राची जबाबदारी आहे. भारतात विवाहानंतर देखील एक मुलगा स्वतःच्या आईवडिलांसोबत राहणे सामान्य बाब असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
संबंधित दांपत्यामधील कायदेशीर लढाई 2009 पासून सुरू झाली होती. तेव्हा पश्चिम मिदनापूर येथील एका कुटुंब न्यायालयाने पतीला पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट घेण्यास मंजुरी दिली होती. पत्नी उघडपणे अपमान करते तसेच भ्याड, कुचकामी अन् बेरोजगार म्हणून हिणवत असल्याचा आरोप तिच्या पतीने केला होता. संबंधित महिलेने स्वतःच्या पतीला शासकीय नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच त्याच्या विरोधात छळ केल्याचा गुन्हा नोंदविला होता. या गुन्हय़ामुळे संबंधित पतीला शासकीय नोकरी गमवावी लागली होती.









