प्रतिनिधी,इचलकरंजी
Ichalkaranji News : येथे झिका संसर्गित रुग्ण आढळल्यानंतर महापालिका प्रशासन हडबडून गेले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. दक्षता म्हणून आयजीएम रुग्णालयात झिका संसर्गित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. तसेच या कक्षासाठी कर्मचारी वर्गाचीही नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुनील देशमुख यांनी दिली.
शहरात प्रथमच झिका संसर्गित रुग्ण आढळल्यामुळे महापालिका प्रशासनासोबत आयजीएम रुग्णालय प्रशासन सतर्क झाले आहे. येथील वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती परगावांहून आल्यानंतर ते आजारी पडली होती. त्यांच्या रक्ताच्या तपासणीमध्ये झिका विषाणू आढळून आल्याने प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. सध्या संसर्गित रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. तर प्रशासनाने खबरदारी म्हणून त्यांच्या घरातील तिघांसह 10 जणांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये 7 महिला व 3 पुरुषांचे समावेश आहे. या सर्वांच्या अहवालाची प्रतीक्षा महापालिका प्रशासनासह शहरवासीयांना लागून राहिली आहे. खबरदारी म्हणून काडापूरे तळ, दातार मळा, लिंबू चौक, शेळके भवन आदी परिसरात औषध फवारणीसह पाणी साठ्यांची तपासणी केली आहे.









