मनपा आयुक्त शुभा बी. यांचा आदेश : 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्यासाठी मुभा
बेळगाव : तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता महापालिकेकडून स्वतंत्र व्यापार परवाना घ्यावा लागणार आहे. परवान्यासाठी अर्ज करण्याची 15 फेब्रुवारी ही अखेरची तारीख असून यासाठी 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हा परवाना एक वर्षासाठी ग्राह्या धरला जाणार असून परवाना न घेणाऱ्यांवर 16 फेब्रुवारीपासून कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. कर्नाटक सरकारच्या नगरविकास खात्याने 19 मे 2022 रोजी बजावलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगरसभा, नगरपंचायतींच्या हद्दीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतून स्वतंत्र व्यापार परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे या आदेशानुसार बेळगाव महानगरपालिकेच्या व्याप्तीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता महापालिकेकडून स्वतंत्र व्यापार परवाना घेणे बंधनकारक असणार आहे. परवान्यासाठी 15 फेब्रुवारी 2025 हा अखेरचा दिवस आहे. यासाठी 500 रुपये शुल्क आकारले जाणार असून सदर परवाना एक वर्षासाठी दिला जाणार आहे. परवाना न घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर 16 फेब्रुवारीनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी तातडीने परवाना घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
परवान्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक…
तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे अर्ज करताना त्याच्यासोबत आधारकार्ड झेरॉक्स प्रत, भाडे करार पत्र आणि फोटो देणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधितांना परवान्याचे वितरण केले जाणार आहे.









