रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सुविधा : काऊंटरवरील भार कमी होण्यास मदत
बेळगाव : जिल्हा रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे औषध वितरण काऊंटरवर रुग्णांचा अधिक भार पडत असल्याने पूर्वीच्या काऊंटरवर केवळ महिलांना औषधे दिली जात आहेत. तर पुरुषांसाठी वेगळे काऊंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे औषध काऊंटरवर होणारी गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे. गरिबांचे रुग्णालय म्हणून जिल्हा रुग्णालयाची ओळख आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील विविध भागातील रुग्ण येण्यासह शेजारील राज्याच्या चंदगड, गडहिंग्लज, गोवा या भागातूनही रुग्ण येत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ओपीडी उपचार घेण्यासह दररोज अॅडमिट होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे.
रुग्णांना डॉक्टर औषधे लिहून देतात. त्याचबरोबर मधूमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, इतर आजारांवर दर महिन्याला औषधे घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील औषध वितरण काऊंटरवर याचा भार पडत होता. रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने बऱ्याचवेळा वादावादीच्या घटनाही घडत होत्या. दुपारी जेवणासाठी आणि सायंकाळी 4 नंतर औषध काऊंटर बंद केले जाते. अशावेळी अनेक जणांना रांगेत थांबूनदेखील औषधे मिळत नव्हती. यापूर्वी एका बाजूला पुरुषांसाठी तर दुसऱ्या बाजूला महिलांसाठी औषध वितरण काऊंटर सुरू होते. पण आता पूर्वीच्या ठिकाणी केवळ महिलांसाठी दोन काऊंटर सुरू करण्यात आली आहेत. तर पुरुषांसाठी बाजूलाच दोन स्वतंत्र औषध वितरण काऊंटर सुरू केली आहेत. त्यामुळे औषध काऊंटरवर होणारी गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे.









