मतदारांची खरेगाळ येथील बैठकीत मागणी, मतदानावर बहिष्काराच्या निर्णयाचा पुनरुच्चार
प्रतिनिधी /काणकोण
पैंगीण पंचायतीमध्ये 16 किलोमीटर दूर दुर्गम भागात असलेल्या मार्ली वॉर्डापासून फारकत घेऊन चिपळे हा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात यावा अशी जोरदार मागणी या वॉर्डातील चिपळे, काळशी या भागांतील मतदारांनी केली आहे. या भागात चिपळे, काळशी, तिर्वण, खरेगाळ, बादेगाळ हे वाडे येतात आणि या भागातील मतदारसंख्या 377 इतकी आहे.
मार्ली आणि तिर्वाळ या भागांतील मतदारसंख्या केवळ 219 इतकी असताना आपल्या वाडय़ापासून 16 किलोमीटर दूर असलेल्या मार्ली येथील मतदान केंद्रावर या परिसरांतील मतदारांना जावे लागते. 10 वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी चिपळे ते मार्लीपर्यंत कदंब बसेसची सोय करण्यात आली होती. त्यानंतर कोणीच या भागांकडे लक्ष दिले नाही, अशी कैफियत खरेगाळ या ठिकाणी घेतलेल्या बैठकीत वरील भागांतील मतदारांनी मांडली.
पहिल्या वेळी महिलांसाठी आणि त्यानंतरच्या तीन निवडणुकांत हा वॉर्ड अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवून बहुसंख्येने असलेल्या सर्वसामान्य आणि इतर मागासवर्गीय मतदारांवर अन्याय करण्यात आलेला आहे. मार्ली येथील जे उमेदवार निवडून येतात त्यांना आमच्या भागांतील मतदार ओळखत नाहीत. निवडून आल्यानंतर आजवर एकदाही या उमेदवारांनी चिपळे, काळशी या भागांतील समस्या समजून घेतलेल्या नाहीत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. 20 वर्षांपूर्वी टाकलेल्या जलवाहिनीतून अजूनही पाणी सोडले जात नाही. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. परंतु एकदाही स्थानिक लोकप्रतिनिधेंनी या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आमच्या भागांची पाहणी केलेली नाही किंवा येथील नागरिकांशी कधी संवाद साधलेला नाही, असे सांगून उपस्थित मतदारांनी, यावेळच्या पंचायत निवडणूक मतदानावर सरळ बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी स्पष्ट केले.









