आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत घेतला निर्णय : नागरिकांची गैरसोय होणार दूर
बेळगाव : सर्व्हर समस्येसह अन्य कारणांमुळे जन्म आणि मृत्यू दाखले मिळण्यास विलंब होत असल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे बेळगाव दक्षिण आणि उत्तर या दोन्ही मतदारसंघांसाठी स्वतंत्र जन्म-मृत्यू दाखले वितरण विभाग सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारच्या महापालिका आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. स्थायी समिती सभागृहात बुधवारी पार पडलेल्या आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीशैल कांबळे होते. सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरींनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखविले. त्यानंतर विविध प्रस्तावांना बैठकीत चर्चा करून मंजुरी देण्यात आली. त्यावेळी सदस्य राजू भातकांडे यांनी जन्म-मृत्यू दाखले विभागाचा प्रश्न उचलून धरला.
जन्म व मृत्यू दाखले विभागात अर्ज केल्यानंतर संबंधितांना वेळेत दाखले मिळणे कठीण झाले आहे. सर्व्हर समस्या असल्यास ती तात्काळ दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाढीव कॉम्प्युटर आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. त्यावर आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे उत्तर देताना म्हणाले, सर्व्हर समस्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र जन्म-मृत्यू दाखले विभागाचे सर्व्हर बेंगळूरला असल्याने सर्व्हर समस्या सोडविण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात येईल. सध्या कार्यरत असलेल्या जन्म-मृत्यू दाखले विभागात जन्म-दाखल्यातील दुरुस्ती व वितरण सुरू आहे. तर आयटी विभागातूनही कामकाज केले जात आहे, असे सांगितले. दररोज 120 हून अधिक नवीन अर्ज येत आहेत. तर 200 हून अधिक दाखल्यांचे दररोज वितरण केले जाते, असेही डॉ. नांद्रे यांनी सांगितले.
वितरण विभागातील ताण होणार कमी
जन्म-मृत्यू दाखले मिळविण्यासाठी दक्षिण आणि उत्तर विभागातील नागरिकांना महापालिकेच्या मुख्य कार्यालयात यावे लागत आहे. त्यामुळे जन्म-मृत्यू दाखले वितरण विभागावरील ताण कमी होण्यासह लोकांनादेखील सोयीचे होईल यासाठी दक्षिण मतदारसंघात स्वतंत्र जन्म-मृत्यू दाखले वितरण विभाग सुरू करावे, अशी सूचना आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीशैल कांबळे यांनी केली. सध्या यासाठी एकच की असून दुसऱ्या कीसाठी पत्र पाठविले जाईल असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे एकंदरीत दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांसाठी दोन स्वतंत्र जन्म-मृत्यू दाखले विभाग सुरू होणार आहेत. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
यापुढे दवाखान्यातूनच स्वीकारणार अर्ज
सध्या जन्म-मृत्यू दाखले अर्ज स्वीकारण्यासह दाखल्यांचे वितरणदेखील आरोग्य विभागाकडूनच केले जात आहे. 30 पेक्षा जास्त बेड असलेल्या दवाखान्यातून जन्म-मृत्यू अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यापुढे संबंधित दवाखान्यातूनच जन्म-मृत्यू दाखले अर्ज ऑनलाईनद्वारे स्वीकारण्यात येणार असून त्यांना केवळ मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात जन्म-मृत्यू दाखले वितरण व्यवस्था अधिक सोपी होणार आहे. यासाठी शहरातील दवाखान्यांच्या डॉक्टर्सना प्रशिक्षणही देण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी बैठकीत स्पष्ट केले.









