सचिन बरगे,कोल्हापूर
Kolhapur News : कसबा बावडा परिसरात धाब्यांच्या संख्येत वाढ झाली असून, ग्राहक वाढीच्या नादात जेवणासह अवैधरित्या मद्यपानाची स्वतंत्र व्यवस्था केल्याने येथील धाब्यांना बारचे स्वरुप आले आहे. जोखीम पत्करून उघड्यावर मद्यप्राशन करण्यापेक्षा येथील धाब्यामध्ये बसून मद्यप्राशन करण्याला मद्यपी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे येथील काही धाबे व हॉटेलमध्ये नेहमीच वर्दळ असते. तसेच रिकाम्या झालेल्या मद्याच्या बाटल्या हॉटेल व्यवसायिक शेतामध्ये टाकत असून याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना होत आहे. तेंव्हा अवैधरित्या मद्यप्राशनासाठी व्यवस्था करणाऱ्या हॉटेल चालकांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांमधून होत आहे.
पोलीसांच्या वरदहस्तानेच हा प्रकार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमधून केली जात आहे. शहरालगत असलेल्या कसबा बावडा ते शिये टोल नाका या मार्गावरील संपूर्ण भागात शेती आहे. सध्या या परिसरात हॉटेल व धाबा संस्कृती वाढली आहे. निसर्गरम्य वातावरणात भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी येथे नेहमीच लोकांची गर्दी असते. मात्र सध्या येथील काही हॉटेलमध्ये वेगळाच प्रकार सुरु आहे. जेवणासह ‘पिण्याची व्यवस्था’ असल्याचेही हॉटेल व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे खवय्यांपेक्षा मद्यपीची गर्दी याठिकाणी जास्त होताना दिसत आहे. रिकाम्या झालेल्या मद्याच्या बाटल्या बाजूच्या शेतामध्ये फेकल्या जात असून याचा शेतकरी वर्गास नाहक त्रास होत आहे. काही हॉटेलमध्ये तर मद्यपींना बसण्यासाठी वेगळी संगीतमय व्यवस्था केली आहे. काही हॉटेल्स अवैध परमीट रुमसाठी प्रसिद्ध आहेत तर काही उत्कृष्ट जेवणासाठी नावाजलेली हॉटेल्सही आहेत. याठिकाणी मद्यपींमुळे वारंवार वाद होत असून याकडे संबंधित खात्याने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
गांजा मिक्स माव्याची विक्री राजरोस
पानपट्टीच्या नावाखाली कसबा बावड्यात अवैध गुटखा व मावा विक्री राजरोस सुरू आहे. आपल्या माव्यामध्ये जास्तीचा नशा येण्यासाठी काही टपरीमध्ये गांजा मिक्स मावा विक्री केला जात असल्याची चर्चा आहे. या माव्यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे.
लॉजिंगमध्ये दिला जातो अल्पवयींना प्रवेश
एका जुन्या धाब्यावर तर जेवण, दारू पिण्यासह आता कमी- जास्त वेळासाठी लॉजिंगचीही सोय केली असून येथे अवैधरित्या अल्पवयींना प्रवेश दिला जात आहे. अशी चर्चा परिसरात आहे.
मॉर्निंग वॉकला येणारेही त्रस्त
कसबा बावडा ते शिये रस्त्यावर मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. काही मद्यपी फुटपाथवर मद्यप्राशनास बसत असून बाटल्याही फुटपाथवर टाकून जात आहेत. तर काहीजण बाटल्या फोडत आहेत. त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणारे नागरिकही त्रस्त आहेत.
पोलिसांचे दुर्लक्ष
बावडा परिसरातील हॉटेलमध्ये अवैध प्रकार सुरु आहेत. हा प्रकार माहित असूनही कारवाई मात्र होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये संताप आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून कारवाईचा बडगा उगारला जाणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









