तीस हजारी न्यायालयाकडून आरोपीला जन्मठेप , 19.50 लाख भरपाई देण्याचेही आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि गर्भधारणा केल्याबद्दल दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने 45 वर्षीय आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या गंभीर प्रकरणावर अवघ्या 20 दिवसात निकाल दिला. आता दोषीला आजीवन तुरुंगात राहावे लागेल. पॉक्सो कायद्याच्या कलम 6 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने पीडितेला 19.50 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत.
आरोपी आणि पीडित मुलगी यांच्यात सुमारे 30 वर्षांचा फरक होता. वयातील इतका मोठा फरक हा विषय आणखी गंभीर बनवतो. पीडित मुलीला असह्या वेदना झाल्या असतील यात माझ्या मनात शंका नाही. खरे तर, आरोपी पीडितेच्या वडिलांच्या परिचयातील असून ती त्यांना काका म्हणत असे. त्याने मुलीवर अनेक वेळा बलात्कार करत तिला गर्भवती केले, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश (एएसजे) बबिता पुनिया यांनी निकालादरम्यान सांगितले.
प्रकरण कसे उघड झाले…
25 फेब्रुवारी 2025 रोजी पीडितेला पोटदुखीची तक्रार घेऊन रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी दरम्यान तिला प्रसुती वेदना होत असल्याचे आढळून आले आणि तिने त्याच दिवशी मुलाला जन्म दिला. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत निहाल विहार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष देत वेगाने तपास करत आरोपीला शिक्षा ठोठावण्यापर्यंत मजल मारली.









