विक्रमी तेजीच्या प्रवासाला विराम : सेन्सेक्स 888 अंकांनी घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आयटी क्षेत्रातील विक्रीच्या दबावामुळे भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स तब्बल 888 अंकांनी गडगडून बंद झाला. यामध्ये मागील काही सत्रांमध्ये केलेल्या उच्चांकी कामगिरीलाही यादरम्यान पूर्णविराम मिळाला असल्याचे दिसून आले.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 887.64 अंकांच्या नुकसानीसोबत 1.31 टक्क्यांच्या घसरणीसह निर्देशांक 66,684.26 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 234.15 अंकांनी प्रभावीत होत 1.17 टक्क्यांसोबत निर्देशांक हा 19,745.00 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीचा आलेख पाहिल्यास यामध्ये आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांतील नुकसानीमुळे भारतीय बाजारात घसरणीचे सत्र राहिले आहे. मुख्य कंपन्यांमध्ये निफ्टीमधील इन्फोसिसचे समभाग हे सर्वाधिक 7.73 टक्क्यांनी घसरले आहेत.
प्रमुख क्षेत्रे नुकसानीत
शुक्रवारच्या सत्रात प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञानाशी संबंधीत असणाऱ्या क्षेत्रातील निर्देशांक चार टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाले. तसेच एफएमसीजी आणि धातू या क्षेत्रात 1 टक्क्यांची घसरण राहिली आहे. तसेच कॅपिटल गुड्सचा निर्देशांक 1.7 टक्क्यांनी वधारला आहे. याचदरम्यान बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये काहीसा बदल होत बंद झाले.
यासह हिंदुस्थान युनिलिव्हर 3.65, एचसीएल टेक3.33 टक्के आणि विप्रो यांचे समभाग हे 3.07 टक्क्यांनी प्रभावीत राहिले आहेत. यासह टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयटीसी आणि बजाज फायनान्स यांचे समभाग हे घसरुन बंद झाले. लार्सन अॅण्ड टुब्रो, एनटीपीसी, स्टेट बँक, कोटक महिंद्रा बँक, टाटा मोर्ट्स यांचे समभाग मात्र वधारुन बंद झाले.









