जागतिक संकेतामुळे मुख्य कंपन्या सर्वाधिक नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात सेन्सेक्स तब्बल 1000 पेक्षा अधिक अंकांनी कोसळला आहे. यामध्ये विविध घडामोडीपैकी जागतिक बाजारातील विक्रीच्या दबावामुळे आयटी, फायनान्स सर्व्हिस, बँकिंग व ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
शुक्रवारी व्यवहारादरम्यान विनियम दरात घसरण, कच्च्या तेलाच्या किमतीमधील तेजी आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली रक्कम काढून घेण्याचा प्रभाव भारतीय बाजारावर पडला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स 1,016.84 अंकांनी म्हणजे 1.84 टक्क्यांच्या घसरणीसोबत 54,303.44 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 276.30 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 16,201.80 वर बंद झाला आहे. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकादारांनी गुरुवारच्या सत्रात जवळपास 1,512.64 कोटी रुपयाच्या किमतीच्या समभागांची विक्री झाली आहे.
या समभागात घसरण सत्र..
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये कोटक बँकेचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांपेक्षा अधिकने घसरले आहेत. यासह बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा स्टील आणि टीसीएस यांचे समभाग प्रामुख्याने नुकसानीत राहिले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ. रेड्डीज लॅब, टायटन आणि इंडसइंड बँक यांचा समावेश मात्र लाभात राहिला आहे. या व्यतिरिक्त बीएसईतील मिडकॅप, लार्जकॅप आणि स्मॉलकॅप यांच्या निर्देशांकात 1.72 टक्क्यांची घसरण राहिल्याचे दिसून आले.









