सेन्सेक्स 261 अंकांनी मजबूत : जागतिक वातावरणाचा बाजाराला लाभ
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारामधील रिकव्हरीच्या संकेतामुळे मागील तीन सत्राच्या घसरणीला मंगळवारी अखेर पूर्णविराम मिळाला आहे. यामध्ये सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक तेजीत राहिले.
जागतिक घडामोडींचा सकारात्मक परिणाम हा भारतीय बाजारात झाला असून यामुळे दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 261.16 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 66,428.09 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 79.75 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 19,811.50 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये 22 कंपन्यांचे समभाग वधारले आहेत तर निफ्टीही निर्देशांक तेजीत होते. न्यूजेन सॉफ्टवेअरचे समभाग 12 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. तर पीसीबीएलचे समभाग मात्र 4 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत.
जागतिक स्थितीचा आढावा घेताना मंगळवारी आशियातील बाजारामध्ये सियोल, टोकीओ, शांघाय आणि हाँगकाँग यांच्या बाजारात सकारात्मक स्थिती राहिली होती. याचा लाभ हा भारतीय बाजाराला झाल्याने निर्देशांक मजबूत झाले आहेत. निफ्टीत वाहन, स्मॉलकॅप आणि मिडकॅपसह औषध, बँक आणि फायनान्स आदी क्षेत्रांमध्ये तेजीचा कल दिसून आला.
सेन्सेक्समध्ये दिग्गज कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्प, बजाज फायनान्स, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, विप्रो, बजाज फिनसर्व्ह आणि टायटन यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. मात्र याच्या विरुद्ध बाजूला 8 समभागांच्या निर्देशांकात घसरण राहिली. ज्यामध्ये टाटा मोर्ट्स 1.49 टक्के तर इंडसइंड बँक, टीसीएस, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग प्रभावीत राहिले आहेत.









