सुझलॉन एनर्जीचे समभाग 8 टक्क्यांनी वधारले : दुसऱ्या सत्रात बाजार दबावात
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारामध्ये चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे समभाग काही प्रमाणात वधारुन बंद झाले आहेत. यामध्ये मंगळवारपासून भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण संदर्भात बैठक सुरु असून याचा दबाव हा भारतीय शेअरबाजारात दिसून आला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 5.41 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.01 टक्क्यांसोबत 62,792.88 वर बंद झाला आहे. तसेच दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 5.15 अंकांच्या तेजीसोबत 0.03 टक्क्यांनी मजबूत होत निर्देशांक 18,599.00 वर बंद झाला आहे. निफ्टीमध्ये अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग 2.91 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच डिव्हीस लॅबचे समभाग 2.23 टक्क्यांनी वधारले आहेत. तसेच टेक महिंद्राचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत.
बीएसई सेन्सेक्समध्ये अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग हे 3.13 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. यासह कोटक महिंद्रा बँक 1.88 टक्के, टाटा मोर्ट्स 1.68, अॅक्सिस बँक 1.52, मारुती सुझुकीचे समभाग 1.42 टक्क्यांनी, बजाज फिनसर्व्ह 1.25, बजाज फायनान्स 1.22 टक्क्यांनी, महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे समभाग हे 1.20 तर टायटनचे समभाग 0.80 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. या कंपन्यांच्या व्यतिरिक्त एनटीपीसी, आयटीसी, एशियन पेन्ट्स, सनफार्मा आणि इंडसइंड बँक यांचे समभाग वधारले आहेत.
दुसऱ्या बाजूला सेन्सेक्समधील इन्फोसिस 1.98 टक्क्यांनी प्रभावीत झाला आहे. यासह टेक महिंद्रा, टीसीएस, विप्रो, भारती एअरटेल, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, टाटा स्टील, स्टेट बँक, एचडीएफसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग हे घसरुन बंद झाले आहेत.
प्रमुख क्षेत्रांची स्थिती
मुख्य क्षेत्रांमध्ये वाहन आणि रियल इस्टेट यांचा निर्देशांक हा एक ते एक टक्क्यांनी वधारला आहे. यासोबतच माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक 1.5 टक्क्यांनी घसरुन बंद झाला आहे. बीएसई मिडकॅपचा निर्देशांक 0.3 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅपचा निर्देशांक 0.5 टक्क्यांनी तेजीत राहिला आहे.
पतधोरण बैठकीला प्रारंभ
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण संदर्भातील बैठकीला मंगळवार 6 जून पासून सुरुवात झाली आहे. ही बैठक 8 जूनपर्यंत सुरु राहणार असून यावेळी आरबीआय आपल्या बैठकीमधील निर्णय सादर करणार आहे. यामुळे भारतीय बाजारात काहीसे दबावाचे वातावरण राहिले असल्याचे दिसून आले आहे.