अपोलोचे समभाग तेजीत, बजाज फिनसर्व्हचे समभाग घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले आहेत. यावेळी बीएसईमधील सर्व क्षेत्रात तेजी रहिल्याने मिडकॅप, स्मॉलकॅप आदींचे निर्देशांक हे वधारुन बंद झाले. दरम्यान जागतिक पातळीवरील घडामोंडीचाही तितकाच बाजारात प्रभाव राहिल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 282.88 अंकांनी वधारुन निर्देशांक 64,363.78 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 97.35 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 19,230.60 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांची स्थिती पाहिल्यास रियल्टी, बँकिंग आणि औषध क्षेत्रातील समभागांची खरेदी राहिली तर आयटी, एफएमसीजी आणि वाहन निर्देशांक वधारुन बंद झाले. अव्वल कंपन्यांच्या कामगिरीत प्रामुख्याने अपोलो हॉस्पिटल, आयशर मोर्ट्स, एलटीआय माइंट्री आणि टायटन यांची कामगिरी उठून दिसली आहे. तर बजाज फिनसर्व्ह, डॉ.रे•ाrज लॅब, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, इंडसइंड बँक आणि एचसीएल टेक यांच्या समभागात मात्र घसरण राहिली.
टायर निर्मिती करणारी कंपनी एमआरएफने दुसऱ्या तिमाहीत आपला निव्वळ नफा वर्षाच्या आधारे पाचपट झाल्याची नोंद केली आहे. नफा वधारुन तो 572 कोटी रुपये झाला आहे. जो मागील वर्षात समान कालावधीत 124 कोटी रुपये राहिला होता.
अन्य कंपन्यांमध्ये मात्र टाटा मोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, फेडरल बँक, इन्फोसिस, मुथुट फायनान्स, पतंजली फूड्स, स्टेट बँक कार्ड, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, गार्डन रीच शिप बिल्डर यांचे समभाग हे तेजीत राहिले.
कच्च्या तेलाची घसरण
कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने बदल होत आहेत. शुक्रवारी सलग दुसऱ्या आठवड्यातही तेलात घसरण झाली असून मध्यपूर्वेत इस्रायल व हमास यांच्यात युद्धाचा परिणाम तेल पुरवठ्यावर होतोय.









