टाटा समभाग वधारल्याचा बाजाराला झाला लाभ : सेन्सेक्स 85 अंकांनी मजबूत
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले आहेत. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 85.35 अंकांच्या मजबुतीसोबत निर्देशांक 0.14 टक्क्यांसोबत 63,228.51 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 39.75अंकांनी मजबूत होत निर्देशांक 18,755.90 वर बंद झाला आहे. यामध्ये दिवसभरात 5.17 इतक्या टक्क्यांनी टाटाचे समभाग मजबूत राहिले होते.
मुख्य कंपन्यांची कामगिरी पाहिल्यास यामध्ये टाटा स्टीलचे समभाग हे 2.39 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. यासोबतच टाटा मोटर्स 1.49, पॉवरग्रिड कॉर्प 1.42, रिलायन्स इंडस्ट्रीज 1.28, अल्ट्राटेक सिमेंट 1.09, एनटीपीसीचे समभाग एक आणि नेस्ले इंडियाचे समभाग हे बुधवारी 0.93 टक्क्यांसोबत वधारुन बंद झाले. यासोबतच अन्य कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक , टीसीएस, विप्रो , एशियन पेन्ट्स आणि मारुती सुझुकी यांचे समभाग वधारुन बंद झाले.
घसरणीची स्थिती पाहिल्यास यामध्ये सेन्सेक्समधील बजाज फायनान्सचे समभाग हे 0.98 टक्क्यांनी प्रभावीत राहिले आहेत. यावेळी इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल,बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टायटन, आयटीसी, सनफार्मा, एचडीएफसी बँक आणि टेक महिंद्रा यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत.
या मुख्य क्षेत्रांची चमक :
बुधवारी मुख्य क्षेत्रांच्या कामगिरीमध्ये बँक आणि माहिती तंत्रज्ञान वगळता अन्य सर्व क्षेत्रांच्या कामगिरीचा आलेख उंचावला होता. यामध्ये धातू, एफएमसीजी, ऑईल अॅण्ड गॅस आणि पॉवर यांचे निर्देशांक 0.5 ते 1 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाले आहेत.
फेडरल रिझर्व्हची बैठक :
बुधवारी रात्री फेडरल रिझर्व्हची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा फक्त अमेरिकेवर नाही तर संपूर्ण जगभरातील देशांवर प्रभाव राहणार आहे. यामुळे आर्थिक विश्वाचे लक्ष हे फेडरलच्या बैठकीकडे लागून राहिले आहे. कारण यामध्ये पुन्हा एकदा व्याजदर वाढ होणार का व्याजदर स्थिर राहणार हे पहावे लागणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहेत.









