सेन्सेक्स 323 अंकांनी तेजीत, सरकारी बँकांचे समभाग तेजीत
मुंबई :
बुधवारीही भारतीय शेअर बाजारात तेजीचा सूर कायम राहिला आहे. सेन्सेक्स 323 अंकांनी वाढत बंद झाला. सर्व निर्देशांकांत आयटी निर्देशांक सर्वाधिक तेजीत राहिलेला पहायला मिळाला. सरकारी बँकांचे समभागही तेजीत होते. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 323 अंकांनी वधारत 81425 च्या स्तरावर बंद झाला होता तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 104 अंकांनी वाढत 24973 च्या स्तरावर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 319 अंकांच्या वाढीसोबत 54536 अंकांवर बंद झाला.
निर्देशांकांची कामगिरी
निफ्टी व बँक निफ्टी निर्देशांक सलग सहाव्या दिवशी तेजीत राहिला होता. भारत इलेक्ट्रॉनिक्स व विप्रो या समभागांनी दमदार कामगिरी केली. परसिस्टंट व कोफोर्ज या कंपन्यांच्या मजबूत कामगिरीमुळे आयटी निर्देशांक दमदार चमकताना दिसला. इतर निर्देशांकांना तेजीत या निर्देशांकाने मागले होते. पीएसयू बँक निर्देशांक 2 टक्के इतका तेजीत व रियल्टी निर्देशांकही वधारत बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांक 65 अंकांनी वाढत 8593 वर तर मिडकॅप निर्देशांक 535 अंकांनी वाढत 57999 अंकांवर बंद झालेला दिसला. एफएमसीजी व फार्मा निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी तेजीत होता. संरक्षण व विमा क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग खरेदी करण्यामध्ये गुंतवणूकदारांनी बुधवारी रस दाखवला होता. धातू निर्देशांकानेही दुसऱ्या दिवशी आपली चमक फिकी पडू दिली नाही.
सेन्सेक्समध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचे समभाग हे जवळपास 4.50 टक्के इतके तेजीत होते. महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट व इटर्नल यांचे समभाग नुकसानीसोबत बंद झाले. सकाळी सेन्सेक्स 403 अंकांनी वाढत 81504 अंकांवर खुला झाला होता. तर निफ्टी 123 अंकांनी वाढत 24991 अंकांवर खुला झाला होता. निफ्टी आयटी निर्देशांक 2.63 टक्के तेजीसोबत बंद झाला तर पीएसयू बँक निर्देशांक 2.09 टक्के तेजीसोबत बंद झाला. तर सलग तेजीत असणाऱ्या ऑटो समभागांमध्ये नफावसुलीवर भर दिसला. त्यामुळे हा निर्देशांक 1.28 टक्के इतका घसरणीत होता. एमआरएफ, महिंद्रा आणि टीव्हीएस यांचा यात वाटा होता.









