सप्ताहाच्या अंतिम सत्रात चढउताराची स्थिती : सेन्सेक्स 202 अंकांनी घसरुन
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील सप्ताहातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक नुकसानीसोबत बंद झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने आयटी व बँकिंग क्षेत्रातील विक्रीने सेन्सेक्स 202 अंकांनी प्रभावीत राहिला आहे. याचदरम्यान बाजाराचा प्रवास हा चढउताराचा राहिल्याचे दिसून आले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 202.36 अंकांनी प्रभावीत होत 0.31 टक्क्यांसोबत निर्देशांक 64,948.66 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 55.10 अंकांनी घसरुन निर्देशांक 19,310.15 वर बंद झाला आहे. निफ्टीमध्ये हिरो मोटोकॉर्पचे समभाग आणि टीसीएसचे समभाग हे सर्वाधिक घसरणीत राहिले आहेत. यासोबतच अदानी एंटरप्राइजेसचे व अदानी पोर्ट्सचे समभाग हे 3 टक्क्यांनी वधारल्याची नोंद करण्यात आली आहे.
या क्षेत्रांची स्थिती
भारतीय बाजारात शुक्रवारी एफएमसीजी आणि ऊर्जा यांचे निर्देशांक वगळता अन्य क्षेत्रातील कामगिरी ही घसरणीत राहिली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक हा 1.5 टक्के आणि धातू क्षेत्राचा निर्देशांक हा शुक्रवारी 1 टक्क्यांनी नुकसानीत राहिला आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक हे घसरणीसोबत बंद झाले आहेत.
बीएसई सेन्सेक्समध्ये टीसीएसचे समभाग हे सर्वाधिक 2.14 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. यासोबतच टेक महिंद्रा, इन्फोसिस, पॉवरग्रिड कॉर्प, सनफार्मा, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेन्ट्स, टायटन, लार्सन अॅण्ड टुब्रो, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि एनटीपीसी यांचे समभाग हे घसरणीत राहिले.
अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा मोर्ट्स, आयटीसी व स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे समभाग मात्र वधारले आहेत.
शुक्रवारच्या सत्रात आयटी समभागांसोबत पीएसयू समभागांमध्ये नफा वसुली झाली आहे. यामुळे देशातील बाजार प्रभावीत राहिले आहेत. मान्सूनमध्ये सहा टक्क्यांची कमी राहणार असल्याच्या संकेतामुळेही बाजारात प्रभाव राहिला आहे. चीनमधील एव्हरग्रँडच्या दिवाळीखोरीमुळे त्याचा परिणाम हा भारतीय बाजारात राहिला आहे.









