ट्रम्प निर्णय, बजेटमधील निर्णयांचा परिणाम
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय शेअर बाजारामध्ये मंगळवारी मोठी उसळी पहायला मिळाली. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांक दमदार तेजीसमवेत बंद झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी शुल्क आकारणी 1 महिनाभर लांबणीवर टाकल्याने भारतीय शेअरबाजार उसळी घेताना पहायला मिळाला. जागतिक बाजारातही याचा उत्साहवर्धक परिणाम दिसला.
मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1397 अंकांच्या वाढीसह 78583 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 319 अंकांनी वाढत 23739 अंकांवर बंद झाला. अर्थसंकल्पामध्ये झालेल्या घोषणा या सकारात्मक असून त्याचा परिणाम शेअरबाजारात मंगळवारी दिसला. ट्रम्प यांनी कॅनडा व मॅक्सीको यांच्यावर लादलेला नवा कर सध्या तरी लांबणीवर टाकला आहे. या बातमीचा परिणाम सुद्धा बाजारावर सकारात्मक राहिला. एकाच दिवशी गुंतवणूकदारांची रक्कम 5.6 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.









