निफ्टीचीही मजबूत कामगिरी कायम : बाजारात उत्साहाचे वातावरण
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारामध्ये तेजीचा प्रवास कायम राहिला आहे. यामध्ये सलगच्या तिसऱ्या सत्रातही तेजी कायम राहिली आहे. शुक्रवारच्या सत्रात मजबूत तेजी प्राप्त करत सेन्सेक्सने दिवसअखेर 800 अंकांचा टप्पा प्राप्त केला आहे. दुसऱ्या बाजूला निफ्टीनेही आपली कामगिरी कायम ठेवल्याचा फायदा बाजाराला झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 803.14 अंकांनी वधारुन निर्देशांक 1.26 टक्क्यांच्या मजबुतीसोबत 64,718.56 वर बंद झाला आहे. यासोबतच दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 216.95 अंकांनी वधारुन निर्देशांक 19,189.05 वर स्थिरावला आहे. याच दरम्यान जेके टायरचे समभाग हे 14 टक्क्यांनी वधारले आहेत. तसेच बायोकॉनचे समभाग 8 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत.
या क्षेत्रांमध्ये चमक
सर्व क्षेत्रांमधील निर्देशांक वधारुन बंद झाले आहेत. यासोबतच आयटी निर्देशांक 2.5 टक्के आणि पीएसयू बँक यांचे निर्देशांक दोन टक्क्यांनी वधारले आहेत. वाहन आणि कॅपिटल गुड्स यांचे निर्देशांक हे प्रत्येकी 2 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. बीएसईमधील मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक 0.5 ते 0.5 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाले.
सेन्सेक्समध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग हे 4.14 टक्क्यांनी वधारले. यामध्ये इन्फोसिस, इंडसइंड बँक, सनफार्मा, टीसीएस, मारुती सुझुकी, लार्सन अॅण्ड टुब्रो, पॉवरग्रिड कॉर्प, टेक महिंद्रा आणि विप्रो यांचे समभाग वधारुन बंद झाले आहेत.
यासह एचडीएफसी बँक, एचडीएफसी, टाटा मोर्ट्स, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, टायटन, अॅक्सिस बँक, नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, स्टेट बँक, बजाज फिनसर्व्ह आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग तेजीसह बंद झाले. दुसरीकडे मात्र आयसीआयसीआय बँक आणि एनटीपीसी यांचे समभाग हे नुकसानीसह बंद झाले.









