निफ्टीही तेजीसह बंद : बीपीसीएल, अल्ट्राटेकचे समभाग वधारले
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी शेअरबाजार 330 अंकांच्या तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला. खराब तिमाहीतील कामगिरीमुळे युपीएलचे समभाग बाजारात घसरणीत हेते. बीपीसीएल व अल्ट्राटेक यांचे समभाग मात्र तेजीसह बंद झाले होते.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 330 अंकांनी वधारत 64,112 अंकांवर बंद झाला होता तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांकसुद्धा 93 अंकांच्या तेजीसह 19140 अंकांवर बंद झाला होता. मागच्या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्रीवर भर दिला होता. भारतीय कंपन्यांचे तिमाही निकाल विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात कमी पडले असे तज्ञांचे म्हणणे आहे. मागच्या आठवड्यात गुरुवारी विदेशी गुंतवणूकदारांनी 768 दशलक्ष डॉलरची रक्कम बाजारातून काढून घेतली होती. जून 2022 नंतर एकाच दिवशी एवढी मोठी रक्कम काढली गेली आहे.
सोमवारी मात्र शेअरबाजार दुसऱ्या सत्रात तेजीसमवेत कार्यरत राहिला. सेन्सेक्स शुक्रवारी 634 अंकांनी तेजीसह बंद झाला होता. यात बीपीसीएल, अल्ट्राटेक सिमेंट, ओएनजीसी आणि आरआयएल यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले आहेत. तर दुसरीकडे युपीएल, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. निर्देशांकांचा विचार केल्यास निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉलकॅप, निफ्टी आयटी व निफ्टी बँक यांचे निर्देशांक काहीशा तेजीसोबत बंद झाले होते. अदानी समूहातील 7 कंपन्यांचे समभाग तेजी राखून होते. अदानी ग्रीन एनर्जीचे समभाग 5 टक्के तेजीत होते तर अदानी एंटरप्रायझेस 1.47 टक्के, अंबुजा सिमेंट 1.33 व अदानी पॉवर 1.17 टक्के तेजी राखत बंद झाले.
आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिस, अॅक्सिस बँक, गार्डन रिच शिपबिल्डर, देवयानी इंटरनॅशनल, अशनिशा इंडस्ट्रिज आणि एसबीआय कार्ड यांचे समभाग नुकसानीसह कार्यरत होते. मुथुट फायनान्स, पतंजली फूडस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, फेडरल बँक, आयआरसीटीसी व बजाज फायनान्स यांचे समभाग तेजीसह बंद झाले होते. गेल्या दोन सत्रात शेअरबाजार वधारलेला असून या दरम्यान गुंतवणूकदारांना 5.5 लाख कोटींचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. जागतिक बाजारात अमेरिका, युरोप व आशियाई बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे.









