सेन्सेक्स 398 अंकांनी घसरलाः रिअल्टी, धातू समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
शुक्रवारी आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअरबाजार घसरणीसह बंद झाल्याचे पहायला मिळाले. रिअल्टी, धातू, तेल आणि गॅस या क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा कल दिसून आला.
शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 398 अंकांनी कोसळत 57,527 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक देखील 131 अंकांनी घसरत 16,945 अंकांवर बंद झाला होता. शुक्रवारी शेअरबाजारात विक्रीचा माहौल दिसून आला. बीएसईवरील सर्व क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते. रिअल्टी, धातू, तेल आणि गॅस, कंझ्युमर गुड्स या क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, अदानी एंटरप्रायझेस, टाटा स्टील आणि अदानी पोर्ट्स, हिंडाल्को यांचे समभाग घसरणीत राहिले होते. सिप्ला, कोटक महिंद्रा बँक, डॉ. रेड्डीज लॅब्ज, अपोलो हॉस्पिटल, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि पॉवरग्रीड कॉर्पोरेशन यांचे समभाग मात्र तेजीसमवेत बंद झाल्याचे पहायला मिळाले. सार्वजनिक बँकांचा निर्देशांक, धातू निर्देशांक आणि रिअल्टी निर्देशांक जवळपास 2 टक्के इतका घसरणीत होता. . याच दरम्यान आरव्हीएनएल यांनी 1.77 रुपये प्रतिसमभाग अंतरिम लाभांश देणार असल्याची माहिती शेअरबाजाराला दिली. बँक निफ्टी निर्देशांक 221 अंकांच्या घसरणीसह 39,395 अंकांवर बंद झाला. सोनाटा सॉफ्टवेअर या कंपनीने अमेरिकेतील एका रिटेलर कंपनीशी 16 कोटी डॉलर्सचा करार केला असल्याची माहिती शेअरबाजाराला दिली. हिमाद्री स्पेशालिटी केमिकलचा समभाग शेअरबाजारात सर्वाधिक 2.5 टक्के इतका घसरणीत राहिल्याचे दिसून आले. जागतिक बाजारांचा विचार करता अमेरिकेतील बाजार वधारत व्यवहार करत होते. डो जोन्स आणि नॅसडॅक अनुक्रमे 47, 117 अंकांनी वधारत व्यवहार करत होते. याउलट युरोपियन बाजार मात्र घसरणीत व्यवहार करत होते.









