निफ्टी 23,072 वर बंद : डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार युद्धाची धमकी
वृत्तसंस्था/ मुंबई
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार युद्धाच्या धमक्यांमुळे मंगळवारी (11 फेब्रुवारी) देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. जागतिक बाजारपेठेतील संमिश्र वातावरणामुळे बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 1.32 टक्क्यांवर बंद झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबाबत केलेल्या घोषणांमुळे, बाजारात चिंता दिसून येत आहे. त्याच वेळी, गुंतवणूकदार गती राखत आहेत आणि या संधीचा फायदा घेत आहेत.
बीएसई सेन्सेक्स मंगळवारी किरकोळ वाढून 77,384 वर उघडला. दरम्यान, नकारात्मक वातावरणामुळे सेन्सेक्स दिवसअखेर 1018.20 अंकांनी कोसळून निर्देशांक 1.32 टक्क्यांसह 76,293.60 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 50 देखील थोड्या वाढीसह 23,383 वर उघडला परंतु थोड्या वेळाने घसरला. दिवसअखेर 309.80 अंकांनी घसरुन निर्देशांक 1.32 टक्क्यांसह निर्देशांक 23,071.80 वर बंद झाला.
भारती एअरटेल कंपनीचे सर्व समभाग मंगळवारी तेजीसह बंद झाले. झोमॅटोचे समभाग हे सर्वाधिक 5.24 टक्क्यांनी नुकसानीत राहिले. याशिवाय टाटा स्टील, टाटा मोटर्स, पॉवरग्रिड, लार्सन अॅण्ड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, सनफार्मा, टीसीएस, महिंद्रा, रिलायन्स हे प्रमुख घसरणीत राहिले आहेत.
घसरणीचे कारण काय?
- परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय शेअर बाजारात विक्री सुरूच ठेवली. सोमवारी भारतीय शेअर बाजारात एफआयआयने 2463.72 कोटी रुपयांच्या इक्विटी विकल्या.
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेतील स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर 25 टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आणखी कर लावण्याचा इशाराही दिला आहे. यामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये घबराट निर्माण झाली आणि त्याचा परिणाम भारताच्या शेअर बाजारावरही झाला.
- नफा वसुलीसह कमकुवत मार्जिन नोंदवल्यानंतर आयशर मोटर्सचे शेअर्स मिड-डे ट्रेडिंगमध्ये 6.8 टक्क्यांनी घसरले.
गुंतवणूकदारांना 10 लाख कोटींचे नुकसान
मंगळवारी शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य 4,08,53,774 कोटी रुपयांवर घसरले. सोमवारी ते 4,17,71,803 कोटी रुपये होते.









