सेन्सेक्स 317 अंकांनी प्रभावीत : निफ्टीही 18,000 च्या खाली जात बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
सप्ताहातील मागील चार दिवसांच्या तेजीला अखेर सप्ताहातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स 317 अंकांनी कोसळून बंद झाला आहे. तसेच अमेरिकन फेडरल रिझर्व्ह यांच्याकडून व्याजदरात अधिकची वाढ करण्यात येण्याच्या संकेतामुळे भारतीय भांडवली बाजार नुकसानीत राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे दोन्हींही निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 316.94 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 61,002.57 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 91.65 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 17,944.20 वर बंद झाला आहे.
प्रमुख क्षेत्रांच्या कामगिरीचा आलेख पाहिल्यास यामध्ये कॅपिटल गुड्स वगळता अन्य सर्व क्षेत्र घसरणीत राहिले होते. तसेच बीएसई सेन्सेक्समधील मुख्य कंपन्यांपैकी नेस्ले इंडियाचे समभाग सर्वाधिक 3.12 टक्क्यांनी घसरले आहेत. यासह इंडसइंड बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, स्टेट बँक, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, एचसीएल टेक, सनफार्मा, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, टायटन, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर व एचडीएफसी यांचे समभाग प्रभावीत झाले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये मात्र लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग सर्वाधिक 2.18 टक्क्यांनी वधारत बंद झाले आहेत. यासोबतच अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेन्ट्स, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील आणि आयटीसीचे समभाग तेजीत राहिले आहेत.
यामुळे आगामी काळात भारतीय बाजाराचा प्रवास हा सकारात्मक का नकारात्मक दिशेने राहणार हे पाहण्याची गरज असून सोमवारच्या कामगिरीनंतरच बाजाराची मुळ दिशा निश्चित होणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.









