निफ्टी 307 अंकांनी वधारला : बँकांची दमदार कामगिरी
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स निर्देशांक हजार अंकांच्या तेजीसह बंद झाला. विदेशी गुंतवणूकदारांकडून बाजारात पुन्हा एकदा समभागांच्या खरेदीला वेग आल्याचे पहायला मिळाले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1078 अंकांनी वाढत 77984 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 307 अंकांनी वाढ 23658 अंकांवर बंद झाला. 30 समभागांपैकी सेन्सेक्समधल्या 24 समभागांमध्ये तेजी पहायला मिळाली. उर्वरित 6 समभाग घसरणीसह बंद झाले. यामध्ये कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा, पॉवरग्रीड कॉर्प, भारतीय स्टेट बँक यांचे समभाग दमदार तेजीसमवेत बंद झाले.
विविध क्षेत्रांचे निर्देशांक चमकले
दुसरीकडे नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, महिंद्रा आणि महिंद्रा, झोमॅटो, इंडसइंड बँक आणि टायटन यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले. निफ्टी, पीएसयु बँकेचा निर्देशांक 3 टक्के, प्रायव्हेट बँकेचा निर्देशांक 2.42 टक्के, रियल्टी निर्देशांक 1.53 टक्के, ऑईल आणि गॅस निर्देशांक 1.46 टक्के आणि फायनानशिअल सर्व्हिसेसचा निर्देशांक 1.89 टक्के तेजीत होता.
विदेशी गुंतवणूकदार परतले
बाजारामध्ये विदेशी गुंतवणूकदार सलग तिसऱ्या दिवशी खरेदीसाठी परतले असल्याचे चित्र पहायला मिळाले. 21 मार्च रोजी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारामध्ये 7,470 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे. 2025 मध्ये पाहता ही सर्वात मोठी खरेदी मानली जात आहे. 21 मार्च रोजी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 3,202 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले होते. जागतिक बाजारात पाहता आशियाई बाजारामध्ये जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हाँगसेंग आणि चीनचा शांघाय कॉम्पोझिट यांचे निर्देशांक घसरणीत राहिले होते.
21 मार्च रोजी अमेरिकेतील डो जोन्स 0.076 टक्के वाढत बंद झाला. तर सोबत नॅसडॅक कम्पोझिट 0.52 टक्के वाढत बंद झाला. यावर्षी मार्च 2025 मध्ये निफ्टीने निच्चांकी स्तरावरुन चांगली कामगिरी पार पाडली आहे. जवळपास निफ्टी 7 टक्के वाढला आहे.









