44 दिवसांच्या प्रवासानंतर निफ्टी 18,000 च्या टप्प्यावर
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत कामगिरीसह बंद झाले आहेत. यामध्ये सलग सातवी तेजी प्राप्त करत बाजार शुक्रवारी बंद झाला आहे. तर तब्बल 44 दिवसांच्या प्रवासानंतर एनएसई निफ्टीने आपला प्रवास 18,000 च्या वरती पोहोचवला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 463.06 अंकांनी वधारुन 0.76 टक्क्यांसोबत निर्देशांक 61,112.44 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी दिवसअखेर 149.95 अंकांच्या मजबूत कामगिरीसोबत निर्देशांक 18,065.00 वर बंद झाला आहे.
बाजारात प्रमुख क्षेत्रांची कामगिरी पाहिल्यास यामध्ये निफ्टीमध्ये पीएसयू बँक सर्वाधिक 2.45 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच बीएसईमध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक हे 1-1 टक्क्यांनी वधारत बंद झाले आहेत. निफ्टीत अदानी एंटरप्राईजेसने 3.72 टक्क्यांनी सर्वाधिक नफा कमाई केली तर अदानी पोर्टने 3.22 टक्क्यांची तेजी नोंदवली आहे.
सेन्सेक्समध्ये शुक्रवारच्या सत्रात विप्रो सर्वाधिक म्हणजे 2.89 टक्के वधारले, यासोबत नेस्ले इंडिया 2.77, स्टेट बँक 2.32 टक्के, लार्सन अॅण्ड टुब्रो 2.24, आयटीसी 2.24 आणि टेक महिंद्राचे समभाग 1.95 टक्क्यांनी वधारले. यासह रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक व बजाज फायनान्सचे समभागही तेजीत राहिले होते. दुसऱ्या बाजूला सेन्सेक्समध्ये अॅक्सिस बँक 2.39 टक्क्यांनी प्रभावीत झाली. यासह एचसीएल टेक, टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग हे घसरणीसोबत बंद झाले आहे.
आगामी आठवड्यातही अपेक्षा?
चालू आठवड्यातील स्थिती पाहता यामध्ये जागतिक पातळीवरील सकारात्मक परिस्थिती आणि नवीन आर्थिक वर्षातील सादर करण्यात येत असलेल्या कंपन्यांच्या तिमाही अहवालाचे निकाल यांचा काहीसा लाभ बाजाराला झाला आहे. आता हीच स्थिती आगामी आठवड्यातही कायम राहणार असल्याचे काही तज्ञांचे मत आहे. कारण बहुतांश कंपन्यांचे तिमाही अहवाल सादर करण्यात आले असून ते सकारात्मक व नफा कमाईचेच आकडे सादर करत आहेत. याचा लाभ गुंतवणूकदार नवीन आठवड्यात घेतात का? काय नवीन वळण बाजार घेणार हे पहाणे आवश्यक ठरणार आहे.









