वृत्तसंस्था/ मुंबई
आयटी समभागांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याच्या कारणास्तव सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजार तेजीसमवेत बंद झाल्याचे पहायला मिळाले. गुंतवणूकदारांची संपत्ती सोमवारी सुमारे 2.20 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 234 अंकांनी वाढत 61963 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांकही 111 अंकांच्या वाढीसह 18,314 अंकांवर बंद झाला होता. सोमवारी आयटी, टेक, सेवा, फार्मा, युटिलिटी आणि कमोडिटी कंपन्यांच्या समभागांमध्ये सर्वाधिक तेजी पहायला मिळाली. तर दुसरीकडे बँकिंग आणि टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मात्र नुकसानीत पहायला मिळाले. बीएसईवर मिडकॅप निर्देशांक आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.73 टक्के, 0.41 टक्के वाढत बंद झाले होते. बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारभांडवल मूल्य सोमवारी 278.79 लाख कोटी रुपयांवर पोहचलं आहे. जे शुक्रवारी 18 मे रोजी 276.59 लाख कोटी रुपये इतके होते. म्हणजे सोमवारी गुंतवणूकदारांच्या पदरात जवळपास 2.30 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 19 समभाग तेजीसह बंद झाले. ज्यात टेक महिंद्राचे समभाग सर्वाधिक 3.03 टक्के वाढले होते. यासोबत आयटी क्षेत्रातील कंपनी विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक आणि इन्फोसिस यांचे समभाग अधिक तेजी राखून व्यवहार करत होते. तर दुसरीकडे काही समभागांमध्ये घसरणीचा कलही दिसून आला. 11 समभाग सोमवारी घसरणीसह बंद झाले होते, ज्यात एफएमसीजी कंपनी नेस्ले यांचे समभाग सर्वाधिक 1.01 टक्के इतके घसरणीत होते. यानंतर अॅक्सिस बँक, भारती एअरटेल, टाटा मोटर्स आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग सर्वाधिक प्रभावीत राहिले होते.
जागतिक बाजारात अमेरिका व युरोपियन बाजारात घसरण होती. अमेरिकेतील डोव्ह जोन्स 109 अंकांनी तर नॅसडॅक 30 अंकांनी घसरणीत होता. पण दुसरीकडे आशियाई बाजारात मात्र तेजीचा सूर होता. निक्की 278 अंक, हँगसेंग 227 अंक, स्ट्रेट टाइम्स 8 अंक, कोस्पी 19 अंक आणि शांघाई कम्पोझीट 12 अंकांनी वधारत व्यवहार करत होता.








