वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी पुन्हा एकदा भारतीय बाजारात सेन्सेक्सने नवा विक्रम केला असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सलग पाचव्या सत्रात मजबूत तेजी बाजाराने प्राप्त केली आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 274 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 65,479.05 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी दिवसअखेर 66.45 अंकांनी वधारुन निर्देशांक 19,389.00 वर बंद झाला आहे. यामध्ये काहीवेळा निफ्टी 19,400 अंकांच्या जवळपास पोहोचला होता. एनबीएफसी क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग हे तेजीसोबत बंद झाले. तसेच एफएमसीजी आणि वाहन क्षेत्रातील समभाग हे प्रभावीत होत बंद झाले.
गुंतवणूकदारांची नफा कमाई
गुंतवणूकदारांची मजबूत नफाकमाई झाल्याने 13 मुख्य क्षेत्रांमधील 8 क्षेत्रांना फटका बसला आहे. तसेच जून तिमाहीत नवीन कर्ज घेण्यात जवळपास 34 टक्क्यांची वाढ झाली आहे. यापाठोपाठ बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांनी जवळपास 8 टक्क्यांची उसळी घेतल्याची नोंद केली आहे.
जुलै महिन्याच्या प्रारंभी दिग्गज समभागांमधील मजबूत अशी झालेली खरेदी व जून मधील जीएसटी संकलनातील वृद्धी याचा परिणाम भारतीय बाजारात झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. तसेच नफाकमाईचाही फायदा झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सेन्सेक्समधील 30 समभागांमध्ये 19 समभाग हे तेजीत राहिले. तसेच 11 समभागात घसरण राहिली आहे. 7.22 टक्क्यांनी वधारत बजाज फायनान्सचे समभाग मजबूत राहिले आहेत. यासह बजाज फिनसर्व्ह 5.63 टक्क्यांनी वधारलेले होते. टेक महिंद्राचे समभाग 2.50 टक्क्यांनी तेजीत राहिले. तसेच सनफार्मा, एनटीपीसी, टायटन, विप्रो, टीसीएस, कोटक बँक आणि इन्फोसिस यांचे समभाग वधारुन बंद झाले. हिरोमोटोचा समभाग हा डेव्हलप्ड हार्ले ही दुचाकी सादर करण्यात आल्यानंतर कंपनीचे समभाग हे 2 टक्क्यांनी अधिक राहिली. रॉयल एनफील्ड बनविणारी कंपनी आयशर मोर्ट्सचे समभाग 4 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत.









