धातू निर्देशांकावर ट्रम्प निर्णयाचा परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात काहीशी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 77 अंकांनी घसरत बंद झालेला दिसून आला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 77 अंकांनी घसरत 81373 अंकांवर बंद झाला होता तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांकही 60 अंकांनी घसरुन 24690 अंकांवर बंद झाला होता. आशियाई बाजारात मात्र मिळताजुळता कल होता. जून महिन्यातील शेअरबाजाराचे सोमवारी पहिले सत्र होते. बाजारात पाहता दिवसभरात सकाळी घसरण होती पण अखेरच्या 10 मिनीटात चित्र पालटले आणि खरेदीवर भर दिसून आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोलादाच्या आयातीवर 25 टक्क्यावरुन 50 टक्के कर लावण्याची घोषणा केल्यानंतर बाजारात धातू निर्देशांकातल्या कंपन्यांची कामगिरी कमकुवत झालेली दिसून आली. यासोबत याचा परिणाम आयटी कंपन्यांच्या कामगिरीवर दिसला. अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत जीडीपी आकडेवारी जाहीर झाली तरी त्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसला नाही. सेन्सेक्स सकाळी 200 अंकांच्या घसरणीसोबत 81214 अंकांवर खुला झाला होता तर दिवसभरात 800 अंकांनी खाली आला होता. निफ्टीही सकाळी 24660 अंकांवर घसरणीसोबत सुरु झाला होता.
बाजारातील समभागांची कामगिरी पाहिल्यास अदानी पोर्टस्, महिंद्रा आणि महिंद्रा, इटर्नल, पॉवरग्रिड, एचयुएल, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंटस्, कोल इंडिया, लार्सन टुब्रो, सिप्ला, टाटा कंझ्युमर, आयशर मोटर्स, अपोलो हॉस्पिटल, अॅक्सिस बँक, श्रीराम फायनान्स आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग वाढीसोबत बंद झाले. तर भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, हिरो मोटोकॉर्प, ग्रासिम, टेक महिंद्रा, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टायटन, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, कोटक बँक यांचे समभाग घसरणीत होते.
जागतिक बाजारात दबाव
शुक्रवारी सेन्सेक्स 82 अंकांनी घसरुन 81451 अंकांवर बंद झाला होता. आशियाई बाजारात पाहता जपानचा निक्केई 494 अंकांनी घसरुन 37470 अंकांवर बंद झाला. कोरीयाचा कोस्पी 1 अंक वाढत 2698 अंकांवर बंद झाला. हाँगकाँगचा हँगसेंग 131 अंकांनी घसरला होता. चीनचा शांघाय कम्पोझीट सोमवारी बंद होता.









