निफ्टीही तेजीतः रिलायन्स, इन्फोसिस, एचडीएफसी बँक मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात सलगच्या तिसऱया दिवशी बीएसई सेन्सेक्स व निफ्टी हे मजबूत स्थितीत राहिल्याचे दिसून आले. जागतिक बाजारामधील मिळत्याजुळत्या कलाचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर राहिल्याने दिवसभरात रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लि. यामध्ये लिलाव राहिल्याने बाजार तेजीसह बंद झाला.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी सेन्सेक्स 712.46 अंकांनी वधारुन निर्देशांक 57,570.25 वर बंद झाला. यावेळी काहीकाळ सेन्सेक्स 761.48 अंकांच्या उच्चांकावर राहिला होता. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 228.65 अंकांनी वधारुन 17,158.25 अंकांवर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, सनफार्मा, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, एशियन पेन्ट्स, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, विप्रो व एचडीएफसी यांचे समभाग लाभासह बंद झाले. दुसऱया बाजूला मात्र डॉ.रेड्डीज लॅब, कोटक महिंद्रा बँक, भारतीय स्टेट बँक, आयटीसी आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले आहेत.
अन्य घडामोडींचा विचार करता देशामध्ये सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीमुळे विक्री कमी झाली आहे. आर्थिक क्षेत्रांनी चांगली कामगिरी केल्यामुळे त्याचा फायदा भारतीय बाजाराला झाला असल्याचे अभ्यासकांनी यावेळी सांगितले आहे.
जागतिक बाजारांमध्ये आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी लाभासह बंद झाला तर जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिटचे निर्देशांक व हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक नुकसानीसह बंद झाल्याचे दिसून आले. यावेळी कच्चे तेल 1.92 टक्क्यांनी वधारुन 109.2 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.









