जागतिक बाजारातील सकारात्मक घटनांचा प्रभाव
वृत्तसंस्था./ मुंबई
जागतिक बाजारामधील सकारात्मक वातावरणामुळे मंगळवारी भारतीय भांडवली बाजारातील दुसऱ्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत होत बंद झाले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा सेन्सेक्स 63,000 वर पोहोचल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवअखेर 418.45 अंकांसोबत 0.67 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 63,143.16 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 114.65 च्या तेजीसोबत निर्देशांक 0.62 टक्क्यांसोबत 18,716.15 वर बंद झाला आहे. निफ्टीमध्ये टाटा कंझ्युमरचे समभाग हे 2.34 टक्क्यांनी सर्वाधिक तेजीत राहिले आहेत.
सेन्सेक्समध्ये एशियन पेन्ट्स आणि आयटीसीचे समभाग हे सर्वाधिक वधारले आहेत. यासोबतच यावेळी बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्स यांचे समभाग मजबूत राहिले आहेत. यासह नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अॅण्ड टुब्रो, एचडीएफसी, सनफार्मा, टेक महिंद्रा अणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग हे वधारले होते.
अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये कोटक महिंद्रा बँक, एचसीएल टेक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, भारतीय स्टेट बँक, भारतीय एअरटेल आणि टाटा मोर्ट्सचे समभाग प्रभावीत होत बंद झाले आहेत.
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत या आठवड्यात निर्णय व्हावयाचा आहे. त्याकडे गुंतवणूकदार लक्ष ठेऊन आहेत. दुसरीकडे एमआरएफचा समभाग मंगळवारच्या सत्रात 1 लाखाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. यानंतर काहीशी घसरण होत हा 1 लाखाच्या खाली आला होता. 931.45 अंकांनी वधारुन हा समभाग 99,900 वर बंद झाला आहे.
कच्च्या तेलाच्या किमती
डॉलरच्या तुलनेत रुपया 2 पैशांनी मजबूत होत 82.41 वर खुला झाला आहे. 12 जून रोजी रुपया हा 82.43 वर प्रति डॉलरवर बंद राहिला होता. कच्च्या तेलाच्या किंमती मंगळवारी पुन्हा प्रभावीत होत 72.50 डॉलर प्रति बॅरेलवर राहिल्या आहेत.









