अदानी एंटरप्राइजेस 15 टक्क्यांनी तेजीत ः बाजारात चढउतार
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशीच्या सत्रात मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात वाहन, धातू व एफएमसीजीमधील विक्रीच्या प्रभावामुळे सेन्सेक्स व निफ्टी दोन्हीही निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये सेन्सेक्स 220.86 अंकांनी नुकसानीत राहिला होता.
दिग्गज कंपन्यांच्या समभाग विक्रीमुळे मंगळवारी बाजारात मोठी चढउतार राहिली होती. यामध्ये मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स 220.86 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 60,286.04 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 43.10 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 17,721.50 वर बंद झाला आहे.
मंगळवारी बाजारातील स्थिती पाहिल्यास यामध्ये कॅपिटल गुड्स, रियल इस्टेट व खासगी बँकींग क्षेत्रातील समभागात मोठी विक्री राहिली होती. याचा परिणाम हा बाजारावर झाल्याची नोंद केली आहे.
निफ्टीची स्थिती पाहिल्यास यामध्ये टाटा स्टीलचे समभाग 5.32 अंकांनी नुकसानीत राहिले आहेत. यासह हिंडाल्को 4.02, आयटीसी 2.61, हिरोमोटो 1.74 व मारुती सुझुकीचे समभाग 1.66 टक्क्यांनी प्रभावीत राहिले होते.
…..या समभागात मात्र तेजी
निफ्टीवर अदानी एंटरप्राइजेसचे समभाग सर्वाधिक 15.28 टक्क्यांनी मजबूत राहिले होते. यासह डॉ.रेड्डीज लॅब, अदानी पोर्ट्स, कोटक महिंद्रा बँक व इंडसइंड बँक यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत.
तज्ञांच्या नजरेतून……….
अमेरिकेतील मजबूत जॉब डाटा सादर करण्यात आला असून त्यानंतर मात्र देशातील बाजारात घसरणीचा कल राहिला. जागतिक बाजारात केंद्रीय बँकांच्या पॉलीसीच्या आधारावर व्यवहार होत आहेत. जागतिक बाजारात काहीसा नकारात्मकच कल पहायला मिळाला. अमेरिकेतील बाजारात घसरण होती. युरोपियन बाजारातही घसरणच होती. आशियाई बाजारात मिश्र कल राहिला होता.









