ऊर्जा क्षेत्र तेजीत, पीएसयू बँकेचे समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी सेन्सेक्स व निफ्टी यांच्या निर्देशांकांत तेजीची झुळूक राहिली होती. यामध्ये दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दोन्ही निर्देशांकात चढउतारची स्थिती राहिल्याची नोंद केली आहे. ऊर्जा क्षेत्रात तेजीचा कल तर पीएसयू बँकेत नुकसानीचे वातावरण राहिले होते.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 3.94 अंकांनी वधारुन निर्देशांक 65,220.03 वर बंद झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 2.85 अंकांनी वधारुन निर्देशांक हा 0.01 टक्क्यांच्या तेजीसोबत 19,396.45 वर बंद झाला आहे.
बाजारात निफ्टीमधील अदानी एंटरप्रायजेस, एचडीएफसी लाईफ, आयटीसी आणि एनटीपीसीचे समभाग हे सर्वाधिक वधारुन बंद झाले आहेत. तसेच बीपीसीएल, सिप्ला, बजाज फिनसर्व्ह आणि आयशर मोर्ट्सचे समभाग हे प्रभावीत होत बंद झाले आहेत.
‘या’ क्षेत्रांची स्थिती
दिग्गज क्षेत्रांमध्ये मंगळवारी औषध आणि पीएसयू बँक वगळता अन्य सर्व क्षेत्रांमधील निर्देशांक हे वधारुन बंद झाले आहेत. कॅपिटल गुड्स व ऊर्जा क्षेत्रात एक-एक टक्क्यांची तेजी नेंदवली आहे. तसेच धातू आणि एफएमसीजीमध्ये 0.5 ते 0.5 टक्क्यांची तेजी राहिली आहे. बीएसईमध्ये मिडकॅप व स्मॉलकॅप यांचा निर्देशांक एक टक्क्यांनी तेजीत राहिला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्समध्ये एनटीपीसीचे समभाग हे सर्वाधिक 1.46 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच एनटीपीसी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, विप्रो, लार्सन अॅण्ड टुब्रो, अॅक्सिस बँक, टाटा स्टील, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड कॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्स यांचे समभाग हे वधारुन बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये जिओ फायनान्सचे समभाग हे सर्वाधिक 4.99 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. यासह बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा मोर्ट्स यांचे समभाग हे मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
अभ्यासकांच्या नजरेतून बाजाराची स्थिती पाहिल्यास यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील सकारात्मक स्थितीमुळे भारतीय बाजारात तेजीचा प्रवास कायम राहिला आहे. तसेच आयटी व औwषध या सारख्या कंपन्या अर्थव्यवस्थेशी संबंधीत क्षेत्रांमध्ये काहीशी चढाओढ निर्माण झालेली आहे. याचा परिणाम हा भारतीय बाजारात झाला असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.









