पंजाब सरकारची मोठी कारवाई ः अतिरिक्त पोलीस महानिरीक्षकांवर आरोप
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाब सरकारने अमली पदार्थ (ड्रग्ज)प्रकरणी मोठी कारवाई करत अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक राजजीत सिंह यांना बडतर्फ केले आहे. पंजाबमध्ये पहिल्यांदाच एखाद्या उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱयाला नोकरीतून बरखास्त करण्यात आले आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून 2017 मध्ये अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात स्थापन एसआयटीने स्वतःच्या अहवालात राजजीत सिंह यांच्यावर ठपका ठेवला होता.
याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोलीस अधिकाऱयाच्या मालमत्तांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तरनतारनमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना राजजीत सिंह यांनी अमली पदार्थ तस्करांना मदत केल्याचा आरोप आहे. राजजीत सिंह हे सध्या अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक पदावर नियुक्त होते.
राजजीत सिंह यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. एसटीएफने यापूर्वी राजजीत सिंह यांचे निकटवर्तीय पोलीस निरीक्षक इंद्रजीत सिंह यांना अटक केली होती. इंद्रजीत सिंह सध्या तुरुंगात असून त्यांच्या विरोधात खटला सुरू आहे. तर राजजीत सिंह यांच्या मालमत्तांची चौकशी पंजाब दक्षता विभाग करणार आहे.









