रत्नागिरी :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे १०० शाळांना भेटी देण्याचा कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाने प्रस्तावित केला आहे. यामध्ये शासकीय यंत्रणेतील उच्च पदस्थांसोबतच वर्ग १ आणि वर्ग २ च्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन हा उपक्रम करण्याचे निर्देश जारी झाले आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रधानसचिव आदींनी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्याच्या पहिल्या दिवशी मतदारसंघातील किंवा नजीकच्या किमान शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करायचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रम तयार करून पालक सचिवांना कळवायचे आहे. या भेटीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता व सोयी-सुविधा यांचा आढावा घेण्यात येणार आहे.
शाळेला भेट देणारे लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी या उपक्रमाबाबत शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी चर्चा करायची आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी कल कसा वाढेल याबाबत उपाययोजना सुचवणार आहेत.
- …. तर तात्काळ कार्यवाही
या उपक्रमांतर्गत हे अधिकारी भौतिक सुविधा, खेळांच्या सुविधा, पूरक व्यवस्था, स्वच्छता सवयी, पोषण आहार या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. धोकादायक बांधकामे, बंद शौचालये आदी समस्या आढळल्यास यंत्रणेला तात्काळ पावले उचलण्यासाठी ठोस सूचना केल्या जातील.
समाज, पालक यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा म्हणून तसेच बालकांना आत्मविश्वासपूर्ण व्यक्त होता यावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.








