वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोमवारपासून पुणे येथे वरिष्ठांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा सुरू होणार असून या स्पर्धेत अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनची सलग्न असलेल्या पंजाब आणि ओदिशा वगळता इतर अन्य राज्यातील सुमारे 700 मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
24 डिसेंबर रोजी क्रीडा मंत्रालयाने अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनची नवी कार्यकारिणी तहकूब करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान पुण्यातील सोमवारपासून सुरू होणारी ही स्पर्धा म्हणजे 2023 सालातील रद्द करण्यात आलेली वरिष्ठांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा असल्याचा खुलासा क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. या स्पर्धेत पुरुषांसाठी फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन तसेच महिलांच्या विभागासाठी लढती होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे ही स्पर्धा 29 ते 31 जानेवारी दरम्यान होणार आहे.









