ऑनलाईन टीम / पुणे :
ज्येष्ठ गणिततज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून नारळीकर या कर्करोगाशी झुंज देत होत्या. आज सकाळी पुण्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या त्या पत्नी होत.
17 मे 1943 रोजी मंगला नारळीकर यांचा जन्म झाला. 1962 साली त्यांनी मुंबई विद्यापीठतून बीए ही पदवी घेतली होती. त्यानंतर 1964 साली त्या एम. ए. (गणित) झाल्या. या परीक्षेत त्यावेळी त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या होत्या. त्यांनी त्यांचे आयुष्य प्रगत गणितावर काम करण्यावर खर्ची घातलं. लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. शालेय विद्यार्थ्यांसाठी गणिताच्या सोप्या वाटा, गणित गप्पा यासारख्या पुस्तकांसह नभात हसरे तारे, पहिलेले देश, भेटलेली माणसं अशी प्रवासवर्णन देखील त्यांनी लिहिली.
नारळीकर यांना वयाच्या 43 व्या वर्षी कर्करोगाने ग्रासले होते. या दुर्धर आजारावर त्यांनी मातही केली. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागला. कर्करोगाशी झुंज देताना आज त्यांना देवाज्ञा झाली. नारळीकर यांना गीता, गिरिजा व लीलावती तीन कन्या आहेत.








