जत, प्रतिनिधी
Sangli News : जत तालुक्याच्या राजकारण, समाजकारणातील अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असणारे तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज (काका) सिध्दगोंडा पाटील (वय- ६५) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी सकाळी निधन झाले. गेल्या चार वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते.चार दिवसापूर्वी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना विजापूर येथील यशोदा रूग्णालयात दाखल केले होते.त्यांच्या निधनाने जत तालुक्यावर शोककळा पसरली आहे.संख परिसरातील अनेक गावांनी व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.त्यांच्या पश्चात एक भाऊ,पत्नी,एक मुलगा,तीन मुली,सुन,जावई,पुतणे, नातवंडे असा परीवार आहे.अंत्यविधी बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता संख येथे करण्यात येणार आहे.
तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि तालुक्याचे दुसरे ठिकाण असणाऱ्या संख भागाचे नेते म्हणून बसवराज पाटील यांची ओळख होती. वयाच्या सतराव्या वर्षांपासून ते राजकारणात सक्रीय झाले. लोकेनेते स्व.राजारामबापू पाटील यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता.बापू असेपर्यंत त्यांनी त्यांच्या सोबत काम केले.राजारामबापू जनता पक्षाचे अध्यक्ष असताना जतचे बसवराज पाटील यांनी जिल्ह्याच्या युवा अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. १९७९ पासून जनता पक्षाच्या माध्यमातून बसवराज पाटील यांचे राजकारण सुरू झाले. सर्वात कमी वयाचे पंचायत समिती सदस्य होण्याचा मान त्यांना मिळाला होता. कायदयाचा दांडगा अभ्यास आणि सुसंस्कारी नेतृत्व म्हणून त्यांची जिल्हभर ओळख होती. सीमा भागातले मोठे नेते असल्याने सांगलीसह कर्नाटकातही मोठा जनसंपर्क त्यांचा होता.
दरम्यान, एक जून १९५८ साली बसवराज पाटील यांचा जन्म झाला.संख परिसराची परंपरागत पाटीलकी त्यांच्या घराण्याकडे होती त्यांचे चुलते एन.डी.पाटील लोकल बोर्डाचे सदस्य होते.त्यानंतर बसवराज पाटील यांनी राजकारण सुरू केले.ग्रामपंचायत, सोसायटीच्या स्थापनेपासून त्यांनी आजवर गावावर निर्वीवाद वर्चस्व कायम ठेवले.प्रचंड लोकप्रियता,अभ्यासूपणा,लोक जोडण्याची कला यामुळे राजकारणात ते कधीही अपयशी झाले नाहीत.प्रभावी व्यक्तीमत्व आणि काम करण्याची धमक असल्याने स्व राजारामबापंचे लाडके कार्यकर्ते अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती.माजी पंतप्रधान चंद्रशेखर,रामकृष्ण मोरे,माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील,एम.बी.पाटील,देवेगौडा,कुमारस्वामी यांच्यासह स्व.आर.आर.पाटील, पतंगराव कदम,आ.जयंतराव पाटील,आ. मोहनशेठ कदम, आ.विनय कोरे यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांशी त्यांचा स्नेह होता.माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी काढलेल्या कन्याकुमारी ते काश्मीर या पदयात्रेत ते सहभागी होते.कागलपासून ते मध्यप्रदेश पर्यंत स्व. राजारामबापू यांच्या सोबत होते.तसेच बापूंनी उमदी ते सांगली काढलेल्या पदयात्रेचे नेतृत्व त्यांनी केले.
अनेक पदांवर कार्यरत
तालुक्याचे किंगमेकर अशी ओळख असणारे बसवराज पाटील हे १९८६ ते १९९० पर्यंत गावचे सरपंच होते. सन २००५ ते २०११ पर्यंत संख विकास सोसायटीचे चेअरमन, १९७९ आणि १९९२ ते ९७ पर्यंत असे दोन टप्यात तेरा वर्षे पंचायत समिती सदस्य राहीले.सन २००१ मध्ये ते जत साखर कारखान्यवर विक्रमी मतांनी विजयी झाले.तसेच १९९२ ते २००७ पर्यंत अशी सर्वाधिक वीस वर्षे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली.
माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांना दोनदा आमदार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी माजीमंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षात प्रवेश केला. पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख म्हणून या पक्षासाठी मोठे काम केले.जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी जनसुराज्यची भूमिका कायम निर्णायक ठेवली.२००९ साली पहील्या खुल्या विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर २०१२ ते २०१७ पर्यंत जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम काम केले. याचकाळात त्यांना अडीच वर्षे झेडपीचे उपाध्यक्ष व शिक्षण अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळली.अलिडकच्या दोन वर्षांपासून ते राष्ट्रवादीत सक्रीय झाले होते.
शिक्षण संकुलाची उभारणी
बसवराज पाटील यांनी १९८९ साली जत पूर्व भागातील मुलांच्या शिक्षणासाठी निलांबीका शिक्षण संस्थेची उभारणी केली.आज पूर्व भागातील मोठी संस्था म्हणून तिची ओळख आहे.नऊ अनुदानित शाळा, उच्च माध्यमीक कॉलेज, महीला सिनिअर कॉलेज, वसतीगृह यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विभाग,इंग्लीश मेडीयम स्कुलची उभारणी केली.जत पूर्व भागात वीज आणण्यात त्यांचा मोठा वाटा राहीला आहे. संख येथील मध्यम प्रकल्प, यासह जत पूर्व भागातील ८२ गावांना पिण्याचे पाणी देण्यासाठी नगारटेक योजनेची संकल्पना त्यांनी मांडत सर्व्हे केला.विस्तारीत योजना, म्हैसाळ योजनेसाठी मोठा लढा उभारला.संख तालुक्यासाठी सक्षम पाठपुरावा करत अप्पर तहसील कार्यालय मंजूर केले.संख वीज वितरण केंद्र साकारले.कर्नाटक सरकारकडुन पूर्व भागाच्या विकासाला बळ दिले.








