विदेशमंत्री पदाचे होते मुख्य दावेदार
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. वरिष्ठ मुत्सद्दी लियू जियानचाओ यांना जुलै महिन्याच्या अखेरीस एका विदेश दौऱ्यातून परतल्यावर बीजिंगमध्ये अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. जियानचाओ हे चीनच्या विदेश धोरणातील सर्वात सक्रीय चेहरे ठरले होते, अशा पार्श्वूभूमीवर ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
लियू जियानचाओ यांना चीनमध्ये संभाव्य आगामी विदेशमंत्री म्हणून मानले जात होते. 61 वर्षीय लियू यांना जुलै महिन्याच्या अखेरीस एका विदेश दौऱ्यातून बीजिंगमध्ये परतल्यावर ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या चीनकडून याप्रकरणी कुठलीच अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. चीन सरकारच्या राज्य परिषद माहिती कार्यालय आणि कम्युनिट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय संपर्क विभागानेही प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
चीनच्या कम्युनिट पक्षाच्या विदेशी राजनयिक पथकांसोबत संबंधांचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या विभागाचे लियू जियानचाओ हे प्रमुख आहेत. 2022 मध्ये त्यांना ही जबाबदारी मिळाली होती आणि तेव्हापासून त्यांनी 20 हून अधिक देशांचा दौरा केला आहे. तर 160 हून अधिक देशांच्या अधिकाऱ्यांशी गाठीभेटी घेतल्या आहेत. लियू यांचे सातत्याने होणारे विदेश दौरे आणि खासकरून अमेरिकेचे माजी विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांच्याशी वॉशिंग्टनमध्ये झालेल्या भेटीमुळे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते राहिलेले लियू यांना आगामी विदेशमंत्री करण्याची तयारी होत असल्याची चर्चा सुरू झाली होती. लियू यांना ताब्यात घेण्याच्या प्रकाराला आतापर्यंतच्या सर्वात उच्चस्तरीय राजनयिक चौकशीच्या स्वरुपात पाहिले जात आहे. यापूर्वी चीनमध्ये 2023 साली अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे निकटवर्तीय किन गँग यांना विदेशमंत्रिपदावरून हटविण्यात आले होते. किन गँग यांच्या विवाहबाह्या संबधांवरून अफवा पसरल्या होत्या.
चीनच्या उत्तरपूर्व प्रांता जिलिनमध्ये जन्मलेले लियू जियानचाओ यांनी बीजिंग फॉरेन स्टडीज युनिव्हर्सिटीमधून इंग्रजी विषयात पदवी मिळविली आहे. तर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांचे शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांना विदेश मंत्रालयात अनुवादक म्हणून स्वत:चे पहिले पद मिळाले होते. लियू यांनी ब्रिटनमधील चीनच्या दूतावासात काम केले होते, तसेच नंतर इंडोनेशिया आणि फिलिपाईन्समध्ये ते राजदूत होते.









