सातारा :
डॉल्बीने ज्येष्ठांना, महिलांना, लहान मुलांना नाहक त्रास होतो. आजारांना निमंत्रण मिळते. कोणाचा डॉल्बीने अचानक मृत्यू होतो. हे सारं थांबण्यासाठी क्रांतीच्या सातारा जिह्यातून राजधानी साताऱ्यात ज्येष्ठ नागरिकांनी डॉल्बी विरोधात क्रांतीकारक पाऊल उचलले आहे. भर पावसात शिस्तबद्ध असा मोर्चा गोल बागेपासून ते शिवतीर्थापर्यंत काढून छ. शिवाजी महाराजांच्या चरणी ज्येष्ठ नागरिकांनी लीन होवून या सरकारला, या प्रशासनाला डॉल्बी बंदीची सुबुद्धी येवो, असे साकडे घातले आहे.
सातारा ही क्रांतीची भूमी आहे. येथे ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडणारे प्रतिसरकार अस्तित्वात होते. स्वातंत्र्याची पहिली ज्योत याच साताऱ्यातून धगधगली. त्याच साताऱ्यातून डॉल्बी बंदीची हाक ज्येष्ठ नागरिक संघटनांनी देताच गोलबागेच्या समोर सोमवारी सायंकाळी साडे चार वाजता शहरातील ज्येष्ठ नागरिक एका नव्या इराद्याने जमले होते. सातारा शहरातून डॉल्बी बंद करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ नागरिक संघटनांचे सुमारे सव्वाशे सभासद व काही समविचारी संघटना एकत्रित जमल्या. पाऊस सुरु असला तरीही ज्येष्ठ नागरिक आपल्या मुद्यावर ठाम होते. त्यांनी श्री. छ. प्रतापसिंह महाराजांच्या स्मारकास अभिवादन करुन मोर्चाला प्रारंभ केला.

मोर्चा घोषणा देत राजपथावरुन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर पोहोचला. तेथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या स्वीय सहाय्यकाने निवेदन स्वीकारले. डॉल्बी बंदीबाबत राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली. तेथून पुढे मोर्चा पावसात शिवतीर्थावर पोहोचला. छ. शिवाजी महाराजांना अभिवादन करुन मोर्चा समारोप करण्यात आला. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या ज्येष्ठांनी सरकारला, स्थानिक लोकप्रतिनिधींना डॉल्बी बंदीबाबत सुबुद्धी यावी, अशी आर्जवही केली.
- पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
साताऱ्यात डॉल्बीच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाला सातारा शहर आणि शाहुपूरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. पोलीस अधिकारी, कर्मचारी या मोर्चात बंदोबस्तासाठी तैनात होते.
- राजकीय नेत्यांनीही डॉल्बी विरोधी चळवळीत सहभागी व्हावे
न्यायालयाने जो आदेश काढला आहे. त्या आदेशाची अंमाबजावणीच राजकीय वरदहस्तामुळे होत नाही. डॉल्बी तथा साऊंड सिस्टिमचा अतिरेकी हा जीवघेणा आणि त्रासदायक आहे. त्यामुळे साताऱ्यात ज्येष्ठांनी सुरु केलेल्या चळवळीत सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी मतभेद बाजूला ठेवून सहभागी व्हावे, जे होणार नाहीत त्यांचा डॉल्बीला पाठींबा आहे, असेच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी व्यक्त केली.








