फुलेवाडी रिंगरोडवरील खड्डे बुजवण्याचे काम पाडले बंद
ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर शहर आणि उपनगरातील रस्त्यांची वाताहत झाली आहे. शहरातील बहुतांशी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. दरम्यान, नागरिकांच्या संतापानंतर शहरातील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडून पॅचवर्कची तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. मात्र रस्त्याप्रमाणे पॅचवर्कचेही काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून या निकृष्ट कामाचा निषेध करत काम बंद पडले आहे. फुलेवाडी रिंग रोड वरील खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेकडून केले जात आहे. पण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने येथील ज्येष्ठ नागरिकांनी सुरू असलेले काम बंद पाडले आहे.
आपटे नगर ते फुलेवाडी नाका या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेकांचा यामुळे अपघात झाला तरीही प्रशासनाने याकडे कानाडोळा केला पण मनपा उपजल अभियंत्याच्या आईचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यानंतर मनपा खडबडून जागी झाली त्यानंतर फुलेवाडी रिंग रोडवर पॅचवर्कचे काम सुरू केले मात्र बहुतांशी ठिकाणी निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क होत असल्याने परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी रस्त्यावर उतरून महापालिकेचे हे काम बंद पाडले. नागरिकांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स हटवून काम बंद पाडले. यावेळी नागरिकांनी दर्जेदार काम करणार असाल तरच काम सुरू करा अन्यथा काम सुरू करू देणार नाही जर दर्जेदार काम झाले नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी नागरिकांनी पालिकेला दिला. तसेच संतप्त झालेल्या नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हातात डांबर देत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असलेले पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा अशा शब्दात सुनावले. यावेळी आपटे नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरत खडे बोल सुनावले. तसेच केवळ खडी टाकून खड्डे बुजवण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.