संतिबस्तवाड धर्मग्रंथ जळीत कांडाची करणार सखोल चौकशी
बेळगाव : संतिबस्तवाड येथील धर्मग्रंथ जळीत कांडाच्या चौकशीसाठी सीआयडीचे पथक दोन दिवसांपासून बेळगावात तळ ठोकून आहे. मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधिकारी बेळगावला येणार आहेत. हे प्रकरण पोलीस दलाबरोबरच सीआयडीनेही गांभीर्याने घेतले आहे. सीआयडी विभागाचे डीआयजी शंतनू सिन्हा व पोलीसप्रमुख शुभन्विता व त्यांचे सहकारी मंगळवारी बेळगावला येत आहेत. हे अधिकारी संतिबस्तवाडला भेट देऊन धर्मग्रंथ जळीत कांडाची चौकशी करणार आहेत. सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक सुलेमान तहसीलदार यांच्या नेतृत्वाखालील एक पथक गेल्या दोन दिवसांपासून बेळगावात तळ ठोकून आहे. सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांचीही सीआयडीला साथ मिळत आहे. यासंबंधीची माहिती देताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना स्थानिक पोलिसांचेही तपासात सहकार्य असणार आहे.
संयुक्तपणे लवकरच जळीत कांडातील संशयितांना अटक करू, अशी ग्वाही दिली. दि. 12 मे रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात महम्मदनिसार गौससाब तहसीलदार, राहणार संतिबस्तवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता 329(4), 326(जी), 298, 299, 196(1)(बी) अन्वये एफआयआर दाखल झाला होता. हे प्रकरण 26 मे रोजी सीआयडीकडे सोपविण्यात आले असून सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधीची सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन पडताळणी सुरू केली आहे. दि. 11 मे 2025 च्या रात्री 9.15 पासून दुसऱ्या दिवशी 12 मे च्या सकाळी 10.15 या वेळेत संतिबस्तवाड येथील बांधकाम अवस्थेत असलेल्या प्रार्थनास्थळावरून चार वेगवेगळे धर्मग्रंथ, एक हेडफोन नेऊन तेथून जवळच असलेल्या शेतवडीत त्यांना आग लावण्यात आली होती. धार्मिक भावना भडकावून तेढ निर्माण करण्यासाठी अज्ञातांनी हे कृत्य केले होते. आता या प्रकरणी सीआयडी चौकशी सुरू असून मंगळवारी सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बेळगावात दाखल झाल्यानंतर आणखी गती मिळणार आहे.









