आश्रमासह कटकभावी येथे केली पाहणी
प्रतिनिधी/ बेळगाव
हिरेकोडी (ता. चिकोडी) येथील नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी शनिवारी चिकोडीत दाखल झाले होते. या अधिकाऱ्यांनी हिरेकोडी येथील आश्रम व रायबाग तालुक्यातील कटकभावी येथे भेट देऊन पाहणी केली.
सीआयडीचे राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम, सीआयडीचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकाश आदी अधिकाऱ्यांनी शनिवारी नंदीपर्वत आश्रमाला भेट देऊन पाहणी केली.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख वेणुगोपाल, चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलीगार, जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर, चिकोडीचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील आदी अधिकाऱ्यांनीही सीआयडीच्या पथकाला साथ दिली. ज्या नंदीपर्वत आश्रमात महाराजांची हत्या करण्यात आली, त्या आश्रमाला भेट देऊन अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
त्यानंतर रायबाग तालुक्यातील कटकभावी येथे ज्या कूपनलिकेत महाराजांच्या शरीराचे अवयव टाकण्यात आले होते, त्या ठिकाणीही भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती घेतली. राज्य सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविल्यानंतर बेंगळूरहून आलेले एक पथक गेल्या आठ-दहा दिवसांपासून या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहे.
उपलब्ध माहितीनुसार सीआयडीचा तपास अंतिम टप्प्यात आहे. मुनी महाराजांसंबंधी एक डायरीही पोलिसांनी जप्त केली होती. यासंबंधीही सीआयडीच्या प्रमुखांनी माहिती घेतली आहे. 5 जुलै रोजी महाराजांची हत्या झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी 7 जुलै रोजी चिकोडी पोलीस स्थानकात मुनी महाराज बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती. दुसऱ्याच दिवशी 8 जुलै रोजी कटकभावी येथे महाराजांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी नारायण माळी व हसनसाब दलायत या दोघांना अटक केली आहे.









