लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सातारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभागातील एका महिला वरिष्ठ सहाय्यकाला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. आरोपी महिलेला अटक करून आज साताऱ्यातील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक असून, त्यांच्या २४ वर्षांच्या सेवाकालानंतर निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी (माध्यमिक) कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्याबाबत विचारणा करण्यासाठी तक्रारदारांनी संबंधित वरिष्ठ सहाय्यक वैशाली शंकर माने (वय ४०, रा. क्षेत्रमाहुली, ता. जि. सातारा) यांची भेट घेतली असता, त्यांनी “साहेबांना देण्यासाठी” म्हणून २५,००० रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदारांनी तत्काळ ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली. पडताळणीनंतर २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी सापळा रचण्यात आला. आरोपीने पंचासमक्ष २५ हजारांची लाच स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला रंगेहात पकडले.
या प्रकरणी आरोपीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, चौकशीसाठी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकातील मपो. हवालदार गोरे, मपो. शि. माकर, पो. शि. महामुलकर, चा. पो. हवालदार दिवेकर यांनी सहभाग घेतला. तपास पोलीस निरीक्षक सुनिल पाटील करत आहेत.
ही कारवाई पोलीस उप-अधीक्षक दयानंद गावडे (ला.प्र.वि. पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.








