जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची तहसीलदारांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सूचना : टँकरद्वारे पाणी पुरवठा करा
बेळगाव : पावसाला विलंब होत असल्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे त्या त्या भागातील तहसीलदारांनी आमदारांच्या अध्यक्षतेखाली टास्कफोर्स सभा घेऊन आवश्यक असल्यास अनुदानासाठी प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तहसीलदारांना केली आहे. नागरिकांना आणि जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलाविली. ते शासकीय कामानिमित्त परगावी असल्याने त्यांनी ऑनलाईनद्वारे ही बैठक घेवून सूचना केल्या. टास्कफोर्स सभा घ्या आणि त्या त्या तालुका अथवा मतदारसंघात असणाऱ्या पाण्याच्या समस्या जाणून घ्या, त्यावर त्वरित उपाययोजना राबवा, अशी सूचनाही त्यांनी केली. यासाठी ज्यांना अनुदानाची गरज आहे त्यांनी तसा प्रस्ताव पाठवावा. हा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात येईल, असे सांगितले. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या अनुदानामध्ये आमदारांच्या सूचनेनुसार कामाला लागा. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पुरेसे अनुदान उपलब्ध आहे. त्यामुळे लोकांना पाण्यापासून वंचित रहावे लागणार नाही. याची काळजी घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात कोठेही पाण्याची समस्या आढळून आल्यास त्वरित टँकरद्वारे पाणी पुरवठा करा, अशी सूचना त्यांनी तहसीलदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना केली. यासाठी पुरेसे अनुदान उपलब्ध आहे त्याचा उपयोग करून घ्या. स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्राम पंचायतीकडे अनुदान उपलब्ध असून खासगी विहिरींचे पाणी वापरण्याची वेळ आल्यास त्यांना भाडे दिले जावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले. तहसीलदार आणि तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या व्याप्तीमधील ग्राम पंचायतींना भेटी देऊन पिण्याच्या पाण्याची समस्या जाणून घ्यावी व त्वरित उपाययोजना करावी, असेही ते म्हणाले. याच बैठकीत जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी अथणी तालुक्यातील 7 ग्राम पंचयातीमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 40 ठिकाणी विहिरींच्या पाण्याचा उपयोग केला जात आहे, असे सांगितले. खासगी विहिरींचे पाणी वापरताना विहीर मालकांना भाडे दिले जात असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. त्यामुळे अशा विहिरींचा उपयोग घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी के. टी. शांताला, मनपा आयुक्त रुद्रेश घाळी, जिल्हा विकास योजनाधिकारी ईश्वर उळाग•ाr आदी उपस्थित होते. तसेच तहसीलदार, तालुका पंचायतीचे अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख, ग्रामीण पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.









