पोस्टाची ऑनलाईन योजना : बेळगाव विभागात उत्तम प्रतिसाद
प्रतिनिधी/ बेळगाव
बहीण-भावाचे नाते दृढ करणारा एक सण म्हणजे रक्षाबंधन. येत्या 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे होणार आहे. त्यापूर्वी दूरवर असलेल्या आपल्या भाऊरायाला वेळेत राखी पोहोचावी, ही प्रत्येक बहिणीची इच्छा असते. यासाठी पोस्ट विभागाने वॉटरप्रुफ पाकिटातून स्पीड पोस्टने राखी पाठविण्याची योजना सुरू केली आहे. यामध्ये बहिणीला ऑनलाईन हवी ती राखी निवडून ती आपल्या भाऊरायाला ताबडतोब पाठविता येणार आहे.
भारतीय पोस्ट विभाग दरवर्षी काही तरी नवीन योजना आणत असते. राख्या पावसात भिजल्याने त्यांचा रंग निघून जातो. ही समस्या टाळण्यासाठी पोस्ट विभागाने खास रक्षाबंधनासाठी वॉटरप्रुफ पाकीट तयार केले आहे. या पाकिटातून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात त्याचबरोबर विदेशातही बहिणीला आपल्या भावासाठी राखी पाठविता येणार आहे.
वॉटरप्रुफ पाकिटासह राखी तसेच भावासाठी एक संदेशही यामध्ये दिला जाणार आहे. मागील वर्षी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने यावर्षीही पोस्ट विभागाने ही योजना सुरू केली आहे. सध्या नोकरदार महिला वाढल्याने बाजारात जाऊन राखी खरेदी करणे, नंतर त्या पोस्ट कार्यालयात जाऊन पोस्ट करणे यासाठी वेळ नाही. त्यामुळे घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून महिलांना आपल्या भावासाठी राखी पाठविता येईल. यासाठी 120 रुपये आकारले जाणार आहेत.
www.क्arहूक्aज्दू.gदन्.ग्ह या संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण माहिती भरावयाची आहे. एकूण 37 प्रकारच्या राख्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. जे डिझाईन आवडेल ते निवडून त्यानंतर उर्वरित माहिती भरून ती राखी आपल्या भावाला पाठवायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बेळगाव विभागात आतापर्यंत याला उत्तम प्रतिसाद मिळाला असून स्पीड पोस्टने राखी पोहोचणार असल्याने महिला आपल्या वेळेनुसार राखी पाठवत आहेत.
स्पीड पोस्टने राखी भावापर्यंत पोहोचणार
कर्नाटक पोस्ट विभागाने रक्षाबंधनानिमित्त ऑनलाईन राखी पाठविण्याची योजना सुरू केली आहे. यामुळे महिलांना आपल्याला हवी ती राखी भावाला पाठविता येणार आहे. राखी, वॉटरप्रुफ पाकीट, भावासाठी संदेश असे याचे स्वरुप असून स्पीड पोस्टने काही दिवसांमध्ये राखी भावापर्यंत पोहोचणार आहे.
– मंजुनाथ अंगडी (मार्केटिंग व्यवस्थापक, बेळगाव पोस्ट ऑफिस)









