पुणे / प्रतिनिधी :
राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यादृष्टीने महाविकास आघाडी सरकारने प्रस्ताव दिला आणि विधान परिषद निवडणुकीत सहकार्य करू सांगितले. मात्र, हा प्रस्ताव भाजपला मान्य नसल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरेकर म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांनी अर्ज दाखल केला तेव्हाच अर्ज माघारी घेणार नाही, असे स्पष्ट केले होते. शिवसेना खासदार संजय राऊत हे आमदारांना बाजारात विक्री करण्यास ठेवणार आहे का? आमदार हे तीन ते साडेतीन लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे ते बिकाऊ गोष्ट नाहीत, याचे भान राऊत यांनी बोलताना ठेवावे. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार शिवसेनाच करेल कारण ते सत्तेत आहेत. त्यांचा प्रस्ताव मान्य नसल्याने ही निवडणुक होईल.
महागाईवर बोलताना ते म्हणाले, महागाई संदर्भात केंद्र सरकार प्रयत्नशील असून, त्यांनी इंधनावरील कर कमी केला आहे. त्याचसोबत गॅस दर कमी केला आहे. कोरोना संकट, रशिया आणि युक्रेन युद्धामुळे काही प्रमाणत महागाई वाढली आहे. सरकारला एक लाख कोटी रुपयांचा महसूल इंधन दर कमी केल्यामुळे सोडावा लागणार आहे. पेट्रोल, डिझेल दर भाजपशासित राज्यात स्थानिक सेस कमी केल्यामुळे कमी झाले आहेत. पण महाराष्ट्रात राज्य सरकार कोणतेही कर कमी करत नाही.
दरम्यान, ज्ञानवापी मशिदीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पुराव्या आधारे न्यायालय जो निर्णय देईल ती आम्हाला मान्य आहे. काश्मीरमधील पंडितांच्या हिंसाचाराबाबत केंद्र सरकार लवकरच ‘करारा जबाब’ माध्यमातून देईल.
रोहित पवार यांनी जपून बोलावे
आमदार रोहित पवार यांनी स्व. गोपीनाथ मुंडे हे जिवंत असते तर मुख्यमंत्री झाले असते, असे वक्तव्य केले आहे. हयात नसलेल्या व्यक्तींबद्दल बोलून वाद सुरू करणे योग्य नाही. पवार कुटुंबातील कोण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे हे रोहित पवार यांनी जाहीर करावे. अजित पवार, सुप्रिया सुळे हे उमेदवार आहेत का, की रोहित पवार यांच्या मनात कुठल्या कोपऱ्यात मुख्यमंत्री पदाची ओढ आहे. घरातला विषय आहे म्हणून एक उमेदवार निश्चित करा आणि मग आमच्या हयात नसलेल्या मुंडे साहेबांविषयी बोला. हयात नसलेल्या व्यक्तींचा वापर करून वाद निर्माण करायला रोहित पवार अजून लहान आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.