हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न – उध्दव ठाकरे : शिंदेसेनाही आक्रमक
प्रतिनिधी/ मुंबई
मुंबईतील शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी लाल रंग फेकून पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रकार असू शकतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे, तर राज ठाकरे यांनी 24 तासात शोध घेण्याची विनंती पोलिसांना केली आहे.
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पुतळ्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात लाल रंग पडलेला आढळून आला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरे गटाचे अनेक शिवसैनिक तातडीने शिवाजी पार्क येथे जमा झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुतळ्याच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू घेणे सुरू केले आहे. सध्या शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
हे कृत्य करणाऱ्या दोन प्रवत्ती असू शकतात : उद्धव ठाकरे
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. मात्र, आम्ही त्यांना शांत राहण्यास सांगितले आहे. हे कृत्य करणाऱ्या दोन प्रवफत्ती असू शकतात. एक तर ज्याला स्वत:च्या आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज शरम वाटते. आणि दुसरे बिहारमध्ये ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा अवमान झाला म्हणत काही जणांनी बिहारमध्ये बंद करण्याचा असफल प्रयत्न केला, असाच कुणाचा तरी महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, ‘पोलिसांशी आम्ही चर्चा केली असून, त्यांनी सीसीटीव्ही शोधून आम्ही आरोपीला तत्काळ पकडू, असे सांगितले आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे ते लवकरात लवकर आरोपीला शोधतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
24 तासांत आरोपीला शोधा : राज ठाकरे
सदर घटना घडल्यानंतर दुपारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यास्थळी जाऊन माहिती घेतली. यावेळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांकडून राज ठाकरेंना संबंधित घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी राज यांनी सगळे सीसीटीव्ही चेक करा, 24 तासांमध्ये आरोपींना शोधून काढा, अशा सूचना पोलिसांना दिल्या.
निषेध करण्यापलीकडील गोष्टी
कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजकंटक किंवा भेकडांच्या औलादीला कोणती संस्कृती, कोणते संस्कार झालेले नसतील. पोलिसांतर्पे शोध घेतला जात आहे. याचा निषेध करण्यापलीकडील या गोष्टी आहेत. सरकार अपयशी ठरले हे आपल्या प्रत्येक वेळी जाणवत आहे, असे अनिल देसाई म्हणाले.
प्रवीण दरेकरांकडून निषेध
रंग फेकणारी प्रवफती एकतर विकृत मानसिकतेची असू शकते किंवा यामागे काही षडयंत्र आहे का हे देखील पाहायला लागेल. याचे कोणीही समर्थन करणार नाही. या पुतळ्यावर अशाप्रकारे रंग फेकला जात असेल तर हे निषेधार्थ आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
पोलिसांची 25 पथके तपासासाठी सज्ज
मध्य मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकावर अज्ञातांकडून लाल रंग टाकल्याची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासासाठी 25 पथके सज्ज केली आहेत.









