सहकार भारती, दी गोवा राज्य सहकारी बँकेतर्फे आयोजन
पणजी : ग्रामीण भागातील शेती व्यवसाय व शेती उत्पादन यांना चालना मिळावी, तसेच शेतकऱ्यांना सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अधिकाधिक फायदा करून देण्याच्या उद्देशाने पणजीत गुऊवारी 23 रोजी ‘सहकार क्षेत्रासाठी संसदीय अर्थसंकल्पीय तरतुदी’ या विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्र घेण्यात येणार आहे, अशी माहिती दी गोवा राज्य सहकारी बँकेचे चेअरमन उल्हास फळदेसाई यांनी आज दिली. हे चर्चासत्र पाटो-पणजी येथील दी गोवा राज्य सहकारी बँकेच्या सहकार संकुलातील सहाव्य मजल्यावर दुपारी तीन वाजता होणार आहे. पणजीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला बँकेचे व्हाईस चेअरमन पांडुरंग कुट्टीकर, गोवा प्रदेश सहकार भारतीच्या महिला अध्यक्ष सरीता बोरकर, सहकार भारतीचे महासचिव अशोक गावडे, सदस्य महेश आमोणकर, विठ्ठल वेर्णेकर, सुभाष हळर्णकर, रघुवीर वस्त उपस्थित होते.
‘सहकार क्षेत्रासाठी संसदीय अर्थसंकल्पीय तरतुदी’ या विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्राला प्रमुख वक्ता म्हणून रिझर्व बँकेचे संचालक तथा सहकार भारतीचे माजी अध्यक्ष सतीश मराठे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार तथा एनआरआयचे आयुक्त अॅङ नरेंद्र सावईकर, राज्याचे सहकार निबंधक विशांत गावणेकर, अखिल भारतीय संपर्क प्रमुख दिलीप रामू पाटील आदी उपस्थित राहणार आहेत, असे उल्हास फळदेसाई यांनी सांगितले. फळदेसाई यांनी सांगितले की, ‘सहकार क्षेत्रासाठी संसदीय अर्थसंकल्पीय तरतुदी’ या विषयावरील चर्चासत्रात नवीन कायद्यानुसार राज्यासाठी प्राप्त होणाऱ्या युनियन बजेटमधून सहकार तत्त्वावर गोव्याला किती फायदा होणार आहे, याविषयी चर्चा होईल. राज्यातील सहकार क्षेत्राला कसे पुढे नेता येईल व लहान लहान बँका व संस्था यांच्या प्रतिनिधींकडून मिळणाऱ्या सूचना व समस्या यावरही विचाराविनिमय करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. राज्यातील सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींनी या चर्चासत्राला मोठ्या संख्येने सहभागी रहावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.









