पंतप्रधानांच्या हस्ते होणार गुजरातमध्ये प्रारंभ : चिप उत्पादक कंपन्यांसह 23 देशांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित
वृत्तसंस्था /गांधीनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 28 जुलै रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे सेमीकॉन इंडिया कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये 23 देशांचे प्रतिनिधी तसेच फॉक्सकॉन, मायक्रॉन, एएमडी आणि आयबीएमसह अन्य प्रमुख चिप उत्पादन कंपन्यांचा समावेश असेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला भारतातील चिप उद्योगात गुंतवणूकदारांना आकर्षित करायचे आहे. गुजरात सरकारने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की हा कार्यक्रम व्यवसायाच्या संधींद्वारे सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी आहे. भारतातील सेमीकंडक्टर उद्योगाचे भविष्य घडवण्यासाठी ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे.
सेमीकॉन इंडिया तीन दिवस चालणार
सेमीकॉन इंडिया इव्हेंट 28 जुलैपासून 30 जुलैपर्यंत चालेल. फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ, मायक्रॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा आणि अॅडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेसचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मार्क पेपरमास्टर हे तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात वत्ते आहेत. तत्पूर्वी 25 जुलै रोजी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी सेमीकॉन इंडिया प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुले केले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी बोलताना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, ‘सेमीकॉन इंडिया’ची दुसरी आवृत्ती गांधीनगरमध्ये होत आहे, याचा मला खूप आनंद होत आहे. 15 महिन्यांपूर्वी जेव्हा पहिले ‘सेमिकॉन इंडिया’ बेंगळुरूमध्ये लॉन्च झाले तेव्हा जागतिक कंपन्यांमध्ये अनेक प्रश्न होते. गुजरात सरकारने सेमीकंडक्टर धोरण 2022-27 जाहीर केले, ज्या अंतर्गत सरकारने सेमीकंडक्टरमध्ये गुंतवणूक करण्यास किंवा फॅब्रिकेशन मॅन्युफॅक्चरिंग प्रदर्शित करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी वीज, पाणी आणि जमीन शुल्कावर सवलत दिली.
सेमीकंडक्टर चिप म्हणजे काय?
सेमीकंडक्टर चिप्स सिलिकॉनच्या बनलेल्या असतात आणि सर्किटमध्ये वीज नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जातात. ही चिप गॅजेट्सला मेंदूप्रमाणे ऑपरेट करण्यास मदत करते. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू त्याशिवाय अपूर्ण आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप, कार, वॉशिंग मशिन, एटीएम, हॉस्पिटल मशिनपासून ते हॅण्डहेल्ड स्मार्टफोनपर्यंत सर्व उपकरणे सेमीकंडक्टर चिप्सवरच काम करतात.









